कॉलेज स्थापनेचा इतिहास - ८

इतक्या अवघड अटी पुर्‍या करून महाराष्ट्रात ९२ वर्षानंतर दुसरे इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन करण्याचे श्रेय आम्हास मिळाले. संकल्पित अहमदाबाद येथील सरकारी कॉलेज अथवा आनंद येथील कॉलेज निघण्यास आणखी एक वर्ष जावे लागलें. कराची येथे एक इंजिनिअरिंग कॉलेज होते, ते पाकिस्तानमध्ये गेल्याने त्याचे जागी हे दुसरे कॉलेज त्याच गृहस्थांचे हातून महाराष्ट्रात - म्हणजे त्यांचे मायभूमींत स्थापले गेले.

कॉलेजच्या इमारती वगैरे पुर्‍या होऊन त्यांचा उद्घाटनसमारंभ श्री. बाळासाहेब खेर यांचे हातूनच व्हावा अशी आमची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांचे हस्ते २९ नोव्हेंबर १९४७ या दिवशी हा समारंभ करण्यांत आला. त्यापूर्वीच सरकारकडून अपेक्षित अशी दोन लक्ष रूपयांची मदत आम्हांस मिळाली होती. उद्घाटनप्रसंगी श्री. बाळासाहेब खेर यांनी आपल्या अनुभवाने असें सांगितले की, 'सरकारी कॉलेज काढण्याचे प्रयत्नास एक दोन वर्षे अवधिही लागला असता व त्याच्या खर्चाची एस्टिमेट्स तीस लाखांहून सत्तर लाखांवर न्यावी लागली असती !' 'तुम्ही हे कॉलेज २५ लाख रूपयांत उभे करण्याची महत्वाकांक्षा बाळगतां हे विशेष. त्यात सरकारची मदत निदान पांच लाखांची असावी असे मला वाटतें. ती देण्याचा मी प्रयत्न करीन. पण इतर कॉलेजें, जी निघू इच्छितात त्यांना द्यावयाच्या मदतीच्या प्रमाणावर ही रक्कम अवलंबून राहील.'

या पुढचा उल्लेख थोडासा वैयक्तिक असला तरी तो मला करावासा वाटतो. कॉलेज सुरू होईपर्यंत जो उत्साह होता, त्यामुळे उभारलेल्या कर्जाबद्दल बेगुमानपणा वाटत असे व श्रमही अतिशय होऊं शकत. पण कॉलेज उघडल्यानंतर दहा लक्ष रूपयांच्या कर्जाचा बोजा हा तापदायक होऊ लागला. अखंड चिंतेने भीतीचा धसकाच बसत असे व त्यामुळे माझी प्रकृति पुष्कळच खालावली. सप्टेंबर - ऑक्टोबर पासून पडलेल्या ताणाचा शीण जाणवूं लागला; आणि अनेक प्रकार उद्भवले. तापही येऊं लागला. त्यानंतर जबरदस्त कावीळ झाली व त्यांतून थोडीफार सुधारणा होण्यास फेब्रुवारी ४८ पर्यंत अवधिही लागला. उद्घाटन समारंभानंतर एक महिना स्वस्थ पडूनच रहावें लागले. अशा मन:स्थितींत डिसेंबरअखेरचे सुमारास प्रतिकूल अशा स्वरूपाची धक्का देणारी एक घटना कॉलेजात घडून आली.

सोसायटीचे कामासाठी इमारतीचे देखरेखीकरितां जे कारकून होते त्यांचेकडून कोणा तरी एका प्रोफेसरांचा अपमान झाल्यामुळे कॉलेज बंद करण्याची काही तरी योजना आखली गेल्याची तार येऊन धडकली. त्यावेळी प्रि. गोखले हे तेथे नव्हते. पण त्यांनी त्वरेने जाऊन ते सर्व प्रकरण मिटवले; पण दोन वर्षांत प्रतिकूल असा हा धक्का प्रथमच बसला. त्यानंतर दुसर्‍या टर्मचे सर्व कारभार सुरळीत चालून परीक्षेपर्यंत सर्व व्यवस्थित चालले. परीक्षेमध्ये साठ पैकी फक्त बावीसच विद्यार्थी पास झाल्याचे कळलें. हा निकाल अर्थातच असमाधानकारक होता; व त्यास आमच्या संस्थेच्या वैगुण्यापेक्षा इतरही अनेक कारणें होती. म्हणून त्याबद्दल विशेषसा विषाद वाटला नाही. या अवधीत सरकारकडूनही चालू खर्चाकरितां ३३ टक्के ग्रॅंट २५ हजार रूपयांची मिळाली. तरी सुध्दा कॉलेज चालविण्याची वर्षाची तूट साठ हजारांवर गेली. याशिवाय कर्जाचे व्याज सोसायटीस सोसावे लागले ते वेगळेच !

आम्हांस युनिव्हर्सिटीकडून प्रथम संलग्नतेची मान्यता मिळाली होती ती फक्त एक वर्षापुरतीच होती. त्यामुळे दुसर्‍या वर्षी आहे तीच संलग्नतेची मान्यता चालू ठेवण्याचा व दुसरे म्हणजे एस. ई. चा वर्ग चालू करण्याचा अर्ज ३१ ऑगस्टच्या आंतच करावा लागला. तो केला गेला व त्यासाठी मुंबई विद्यापीठाकडून चौकशी कमिटी वगैरे नेमली गेली. पण त्या बाबतीत प्रि. गोखले हे अनुभवी व माहितगार असल्यामुळे आम्हांस पुढच्या वर्षाबद्दल चिंता वाटत नव्हती; फक्त श्री. गोखले सुचवतील तेवढे पैसे उभे करणे एवढेंच आमचे काम होते.

संस्थेचा व्याप वाढू लागला तेव्हा संस्थेच्या उद्देशाप्रमाणे संस्थेच्या अधिक शैक्षणिक सोयींसाठी अधिक जागा घ्यावी असा विचार माझ्या मनांत आला. संस्थेच्या उद्देशांत वैद्यकीय व शेतकीविषयक शिक्षण देण्याच्या योजना घातलेल्या होत्या. संस्थेजवळ आतापर्यंत ५० एकर जागा खरेदी झालेली होती. समोरच्या विलिंग्डन कॉलेजजवळ १२५ एकर जागा आहे, तेव्हा आपल्या संस्थेजवळही इतकी जागा असावी असे वाटूं लागले. आमच्याच प्रयत्नांने तेथील जागांच्या किंमती हळू हळू वाढू लागल्या होत्या. म्हणून आजूबाजूची सुमारे १०० एकर जागा मिळावी असा अर्ज श्री. गोखले यांचे विचाराने करण्याचे साहस मी केले. त्याकरिता एक लाख रूपये खर्च करावे लागतील असे धरले. त्यास बोर्डाची परवानगी हवी होती. बोर्डानेही सातारचे कलेक्टरांची पूर्ण सहानुभूति व वर्षभराच्या चढत्या कार्याकडे लक्ष देऊन माझ्या आग्रहाला मान्यता दिली व अर्ज केला गेला. त्यानंतर परिस्थिती बदलत जाऊन त्यास पुष्कळ अडथळे निर्माण झाले; परंतू सातारचे कलेक्टर श्री. हुबळी यांचे आत्मीयतेचे सहाय्यामुळे १९४९ पर्यंत दम काढल्यानंतर संकल्पित सर्व जागा संस्थेस मिळाली. किंमत मात्र एक लाखांऐवजी दीड लाख रूपये पडली ! या प्रकरणाची सर्व हकीकत १९४९ च्या वृत्तान्तात स्वतंत्र परिच्छेदांत येईल.