कॉलेज स्थापनेचा इतिहास - ९

१९४६ च्या नोव्हेंबरमध्ये इमारतीचे कामास सुरवात झाली; व चौकशी कमिटीही येऊन गेली. त्यानंतर मला असे वाटू लागले की, या कामी दैवी कृपा मिळाली तरच आपल्याला यश येऊ शकेल. या दृष्टीने मी गणपति उपासनेचे एक अनुष्ठान करण्याचें योजिलें. माझें उपास्य दैवत श्रीगणपति असल्यामुळे, व मी पूर्वी एकदा असेच अनुष्ठान केले असल्यामुळे पुन्हा एकदा असे अनुष्ठान करण्याचे ठरविले. ते अनुष्ठान असे :-

एकवीस आवर्तनाच्या एकवीस आवृत्या दररोज करून एकवीस दिवस ते चालवावें. त्याप्रमाणे २६ डिसेंबर १९४६ पासून १५ जानेवारी १९४७ पर्यंत मी ते अनुष्ठान कॉलेजच्या जागेवर केले. त्यावेळी विकत घेतलेल्या जागेचा शेतकरी व मी असे दोघेच तेथे होतो. या जागेत असलेल्या विहिरीच्या पश्चिम बाजूला पूर्वेकडे तोंड करून ३०' बाय ३०' ची जागा आखून घेऊन व त्यावर तट्ट्याची झोपडी करून घेतली व पूर्वाभिमुख मूर्ति ठेवून अनुष्ठान केले. २१ आवृत्त्या होण्यास बारा तास अवधि लागे. त्या अवधींत उच्चारांचे स्खलन होऊ नये म्हणून बरोबर एक गुरूजी आवर्तने म्हणावयास येत असत. असे ते तीन तीन तासांनी बदलून येत असत. त्याबद्दल त्यांना दक्षिणा देत असे, त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही गांवात केली होती. असे अनुष्ठान चालू असताना नैतिक बळ वाढत असल्याचा प्रत्यय मनास येत होता. मी एकभुक्तच असे.

विलिंग्डन कॉलेजच्या क्लबाचा आचारी मला सायंकाळी एक ताट वाढून आणून देत असे. दिवस थंडीचे होते, प्रकृति सुदृढ होती, आहारविहार मर्यादित होता, त्यामुळे मनास अत्यंत प्रसन्नता वाटे. कामावरचे बिगारी घरी गेल्यानंतर सकाळपर्यंत तो शेतकरी व मी एवढेच त्या रानांत राहात होतो. त्या अवधींत कोल्हापूर संस्थानचे अँडमिनिस्ट्रेटर कर्नल हार्वे हे सांगलीस आले असताना सांगलीचे राजेसाहेब त्यांना घेऊन अनुष्ठानाचे ठिकाणी आले होते. कर्नल हार्वे साहेबांना आम्ही म्हणजे मी व प्रि. गोखले - भेटून कोल्हापूर संस्थानकडून निदान दोन चार लाख रूपयांची मदत मिळावी अशी विनंती करून आलो. त्या वेळी पुण्यातील कॉलेजांत संस्थानिकांचे प्रजाजनांना प्रवेश मिळण्यास अडचण पडत असे. म्हणून राजे साहेबांनी एक लक्ष रूपये दिले, त्यावेळी संस्थानचे चार नागरिक या कॉलेजात घ्यावे अशी अट सांगलीच्या राजेसाहेबांनी घातली होती. तशीच अट कोल्हापूरनेंही घालून आम्हांस मदत करावी अशी आमची विनंती हार्वे साहेबांना पाहिली होती. म्हणून ते कोल्हापूरचा नवा दत्तक ठरला म्हणजे हे काम होऊं शकेल असे म्हणाले होते. या संबंधी माझे समक्ष अनुष्ठानाचे ठिकाणी राजेसाहेबांचे हार्वे साहेबांशी जे बोलणे झाले त्यांत त्यांनी माझे अभिनंदन केले व ते सांगलीलाच आले याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

या अनुष्ठानांत अनपेक्षित असे एक चमत्कारिक विघ्न एक दिवस आले. ४ जानेवारीला दुपारी २ वाजल्यापासून ढग जमूं लागले, वारे वाहू लागले व पावसाची वृष्टि होण्याची भीति वाटूं लागली. ७ वाजेपर्यंत अनुष्ठान चालू असल्यामुळे काही निवारा करता येण्याची शक्यताही झाली नाही. त्यानंतर पाऊस येण्याची खात्रीच वाटू लागली. त्यावेळी शेतकर्‍याने व मी कामावरील दोन पत्रे घेऊन श्री गणपतीचे संरक्षणासाठी एक खोपी उभी केली. झोपडीवर पत्रे घालण्याची सोयच नव्हती. रात्री दहाचे पुढे वादळ सुरूं होऊन दोन वाजेपर्यंत खूप पाऊस पडला. निवार्‍याचे छतांचे तट्टे व बाजूचे भिंतीचे तट्टेही उडून गेले व मुसळधार पावसाने झोपडीत पाणीच पाणी झाले. दोन तीन वाजता आकाश निवळले व सकाळी सातला पूर्ववत सर्व अनुष्ठान व्यवस्थित सुरू करता आले. शेतकरी म्हणाला: पावसाने शेतातील किडे, मुंग्या, साप बाहेर येऊ शकतात; पण तसा काही प्रकार झाला नाही. अनुष्ठानांतील सर्व दिवशी श्री. हरिभाऊ पटवर्धन हे सकाळी अगर संध्याकाळी येऊन एक दोन आवर्तने म्हणून जात असत. समाप्तीचे दिवशी राजेसाहेब स्वत: मोटार घेऊन त्या जागी आले व मला प्रसादासाठी घेऊन गेले. अनुष्ठानानें मनास खूप प्रसन्नता आली व यश येणार अशी खात्री वाटू लागली.