कॉलेज स्थापनेचा इतिहास - ७
पहिली अट - फक्त साठच विद्यार्थांना प्रवेश देण्यात येईल अशी होती. वास्तविक एका वर्गाची ७५ विद्यार्थ्यांची परवानगी द्यावयास पाहिजे होती. ती कोणाच्या तरी अनुदार वृत्तीने ६० करण्यात आली. त्यामुळे संस्थेचे सहा हजार रूपयांचे नुकसान झाले.
दुसरी अट - अशी होती कीं साठच मुलांच्या कॉलेजला सुरवात करून तीन वर्षे चालविले असता सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान सोसायटीस येण्याची शक्यता आहे; यासाठी सोसायटीने कॉलेज चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना दीड लक्ष रूपयांची रक्कम युनिव्हर्सिटीच्या नांवाने वर्गीकृत केलेली अशी कोणत्यातरी शेड्यूल्ड बँकेत ठेव म्हणून ठेवावी.
तिसरी अट - अशी होती की, प्रवेश करीत असलेल्या साठ विद्यार्थ्यांना डिग्रीपर्यंत पोचविण्याची जबाबदारी, तीन लक्ष रूपयांची जामिनकीच्या स्वरूपाची रोख रकमेचे वरीलप्रमाणे डिपॉझिट ठेवून, सोसायटीने पत्करावी.
चौथी अट - दरवर्षी वीस हजाराप्रमाणे पांच वर्षात एक लक्ष रूपयांचा रिझर्व्ह फंड तयार करावा.
या जबरदस्त अटींची कल्पना मे महिन्यांतच आम्हांस आली होती. त्यापैकी दीड लक्ष रूपयांची तरतूद आम्ही मनाने अशी योजिली होती कीं - श्री. बाळासाहेब खेर यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे दोन लक्ष रूपयांची मदत मुंबई सरकारकडून लौकरच मिळून आम्ही त्या अटीची पूर्तता करू शकू. पण मुंबई सरकारची मदत मिळावयाची ती लवकरात लवकर म्हटले तरी ऑक्टोबरपर्यंत मिळणे कठीणच होते. कारण सप्टेंबरांत असेंब्ली अधिवेशनात ग्रँट मंजूर होऊन नंतर ती मिळावयाची ! परंतु संलग्नतेची मान्यता मिळावयाच्या आंत या सर्व अटी पुर्या करावयास हव्या होत्या.
वरीलपैकी दीड लाखाची व्यवस्था आम्ही पुढीलप्रमाणे केली :-
सहा स्नेह्यांकडून प्रत्येकी २५ हजार रूपये याप्रमाणे तीन वर्षे मुदतीच्या ठेवी घेऊन त्यांची दीड लक्ष रूपयांची रक्कम युनिव्हर्सिटीच्या नांवे वर्ग केलेली अशी ठेव ठेवून ही अट पुरी केली. ज्या गृहस्थांनी ही अट पुरी करण्याचे कामी मदत केली त्यांच्या नावांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो.
(१) श्री. के. व्ही. केळकर,
(२) श्री. स. ग. गोखले,
(३) श्री. के. एम. व्होरा, मुंबई,
(४) श्री. वि. श्री. पटवर्धन, मिरज,
(५) श्री. सी. जे. शहा,
(६) पुणे अ. वि. गृहाचे श्री. वि. गं. केतकर.
(त्यांच्या संस्थेजवळ अशी काही रक्कम होती व तिचा उपयोग शैक्षणिक कार्याकडे करण्यास थोडा अवधि होता. म्हणून त्यांनी ही रक्कम आमच्या कार्याला तात्पुरती दिली व आमच्या संस्थेस अपूर्व उत्तेजन दिले. या त्यांच्या थोरवीबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणीच राहूं. ही रक्कम त्यांना परत गरज लागेपर्यंत त्यांनी आमच्याकडे ठेव स्वरूपात ठेवली होती.)
सर्व ठेवीदारांना असा विश्वास वाटत होता की, बँकेतील ठेव जरी दुसर्याचे नावांने असली तरी ती पूर्ण सुरक्षित आहे. याप्रमाणे दीड लाखाची व्वस्था झाली व तीन लाखांची व्हावयाची राहिली. त्या कामी महाराष्ट्र बँकेचा उपयोग होईल अशी एकदा कल्पना आली. पण प्रस्थापक सभासदांपैकी चार पांच जण बँकेचे डायरेक्टर असल्यामुळे तसे करणे हितकर नाही असें म्हणून तो मोह आम्ही कटाक्षाने टाळला. तीन लाख रूपयांची अशा स्वरूपाची मदत करूं शकेल अशी महाराष्ट्रातील दुसरी संस्था म्हणजे वेस्टर्न इंडिया विमा कंपनी. त्यांचेकडे शब्द टाकण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे श्री. आण्णासाहेब चिरमुले यांची गाठ घेऊन संस्थेची गरज व असे पैसे ठेवण्यात कशी सुरक्षितता आहे याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. हा व्यवहार बँकेच्या साध्या व्यवहारांत बसणारा केव्हांच नव्हता हे आम्हांस कबूल करावेच लागले. परंतु केवळ संस्थेची उपयुक्तता पाहून आमची सोय करण्याचे त्यांनी दूर करण्याकरिता बोर्डाची विशेष सभा घेऊन आमचे कार्य पुरें केले. त्याकरिता त्यांनी आपल्या स्वदेशी कमर्शिअल बँकेचाहि आम्हांस उपयोग करू दिला, व आमची अडचण भागविली. त्याकरितां श्री. चिरमुले, त्यांचे डायरेक्टर बोर्ड, स्वदेशी कमर्शिअल बँक या सर्वांचे कायमचे ऋण संस्थेवर आहे.