कॉलेज स्थापनेचा इतिहास - ६

ना. खेर यांची भेट सप्टेंबरमध्ये झाली. त्यांनी आमच्या प्रयत्नांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. सरकार लवकरच अहमदाबाद येथे एक इंजिनिअरिंग कॉलेज काढणार असल्याचे त्यांनी सांगितले व मुंबई राज्याच्या वाटणीच्या दृष्टीने तुमचें कॉलेज पुणे येथे न काढता कर्नाटकात ते काढले गेले तर सरकारला अधिक मदत करतां येणे शक्य होईल असा अभिप्राय व्यक्त केला. पुणे येथे सरकारी मान्यता मिळाली तरी सरकारी ग्रँट कमी मिळू शकेल हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कॉलेज उभारणीसाठीं युनिव्हर्सिटीकडे जो अर्ज करावयाचा त्यांत कॉलेजचे स्थान अनिश्चित असल्याचे कळवावे लागले. सोसायटीने इतकाच निर्णय घेतला की पुण्यास कॉलेज न काढता ते सांगली, बेळगांव, धारवाड या भागांत काढावे. त्याप्रमाणे श्री. गोखले यांनी त्या भागांत जाऊन लोकमताचा अंदाज व अनुकूलता यांचा कयास घेऊन सांगली येथेच कॉलेज काढावे असे आपले मत व्यक्त केले. सांगलीचे राजेसाहेबांनीही सांगली येथे कॉलेज निघण्यास मदत देण्याचें कबूल केले. तसेंच जवळपास संस्थाने असून त्यांचेकडूनही मदत मिळण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे सांगलीसच कॉलेज काढण्याचा आमचा निर्णय आम्ही मुंबई विद्यापीठास कळविला.

दि. ३१ मार्च १९४७ ला कॉलेजच्या पायाचा दगड बसविण्याचा समारंभ सांगलीच्या राणीसाहेब श्रीमंत सौ. सरस्वतीबाई पटवर्धन यांचे हस्ते करण्यात आला व जून अखेर दोन लॅबोरेटरीज, कॉलेजची मुख्य इमारत, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अशा जरूर त्या सर्व इमारती सुमारे सात लक्ष रूपये किंमतीच्या सहा महिन्यांत पुर्‍या करण्यांत आल्या. त्या कामी सांगली येथील इंजिनिअर श्री. वामनराव कुंटे व पुण्याचे काँट्रॅक्टर श्री. रंगूमामा जोगळेकर व सांगली येथील काँट्रॅक्टर कै. बाबूराव वडार यांची चांगली मदत झाली. वास्तुशांत समारंभ १२/६/१९४७ ला झाला. या वेळी सातारचे कलेक्टर श्री. हुबळी सहकुटुंब उपस्थित होते.

कॉलेजच्या इमारती सात लक्ष रूपयांच्या व इतर सामग्री तीन लक्ष रूपयांची अशी दहा लक्ष रूपयांची सिध्दता करण्याकरतां सांगलीच्या राजेसाहेबांनी एक लक्ष रूपयांची देणगी, श्री. श्री. गो. मराठे यांनी आपल्या स्वत:च्या पतीवर दोन लक्ष रूपयांची तीन वर्षांच्या मुदतीची कर्जाऊ रक्कम जमखिंडीचे राजेसाहेब यांचेकडून मिळविली ती, व श्री. साठे यांनी १९४० मध्ये स्थापन केलेल्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कंपनी लि. या कंपनीच्या ठेवींपैकी तीन लक्ष रूपयांचा उपयोग, तसेच प्रस्थापकांपैकी कर्नल श्री. श्री. आ. फाटक यांनी पन्नास हजार रूपये संस्थेच्या स्वाधीन केले ते व इतर अनेकांनी ठेवी व देणग्या दिल्या त्या, तसेच काहींनी उधारीने मदत केली ती, या सर्वांचा उपयोग झाला. याचे फलित स्वरूप म्हणजे कॉलेजची उभारणी जूनअखेर झाली असे म्हटले पाहिजे.

मुंबई युनिव्हर्सिटीने १ जून १९४७ ला पहाणी करण्यासाठी चौकशी कमिटी पुन: पाठविली होती. त्यावेळी कमिटीच्या तीन सभासदांपैकी श्री. एन्. व्ही. मोडक हे एकटेच येऊ शकले. त्यांनी सर्व प्रकारची चौकशी करून, कॉलेज जूनमध्ये सुरू करता येणे शक्य आहे असा अभिप्राय व्यक्त केला व त्याप्रमाणे हा अभिप्राय युनिव्हर्सिटीकडे कळविला. ता. २३ जून १९४७ ला सरकारी मान्यताही मिळून कॉलेज सुरू करता आले.