कॉलेज स्थापनेचा इतिहास - ५
(२) व्हाइस चेअरमन - श्री. श्री. गो. मराठे,
(३) खजिनदार - श्री. ध. कृ. रानडे,
(४) सेक्रेटरी - धों. कृ. साठे, व बाकी सर्व सभासद होते.
यानंतर तयारी करतां श्री. गोखले यांनी पूर्वीच्या योजनेची तपासणी करून पहिल्या वर्षाचे तयारीसाठी काय वस्तु लागतील व त्या कोठे व काय किंमतीस मिळू शकतील याच्या चौकशीस सुरवात केली. इमारत, जागा वगैरेंची व्यवस्था करण्याचे काम श्री. धों. कृ. साठे यांचेकडे सोपविण्यात आले. जागा व इमारतीची सोय करण्याचे बाबतींत लॉ कॉलेजची जी जागा खरेदी करण्याची जरूरी होती. त्या बाबतीत अनेक ठिकाणी चौकशी करून श्री. साठे यांनी श्री. हरि विठ्ठल तुळपुळे यांची स्वारगेटाजवळ असलेली नऊ एकर जागा शंभर वर्षांचे भाडेपट्ट्यानें (जरूर पडल्यास खरेदी करण्याचें ठरल्यास किंमतीचा आकडा ठरवून) कायम करून टाकली. परंतु पहिलीं एक दोन वर्षे तरी लॉ कॉलेजचे मदतीचा फायदा घेणे अवश्य होतें. त्या बाबतीत श्री. नानासाहेब घारपुरे यांनी आत्मीयतेनें मदत करून त्यांच्या सोसायटीच्या काही अडचणी दूर करून घेऊन जागा देण्याचे कबूल केले व फेब्रुवारीचे पहिल्या आठवड्यांत वर्कशॉप बांधण्याकरतां पाया उकरण्याचा मुहूर्तहि करण्यात आला.
ही वर्कशॉपची इमारत लॉ सोसायटीचीच होणार असल्यामुळे या इमारतीचा खर्च त्यांनीच करावा हें त्यांनाही पटले होते. परंतु त्यांना ते सोसायटीकडून मंजुर करून घेता आले नाही. त्यात पंधरा दिवस गेले. त्यामुळे इमारत ताबडतोब पूर्ण होण्याची शक्यता दुरावली. सोसायटीजवळ जमलेले ८० ।९० हजार रूपये इंप्लिमेंटसाठी खर्च करावयाचे होते. त्या बाबतीतहि सरकारी कंट्रोल व त्यामुळे येणार्या अडचणी यामुळे ती जमवाजमवहि अशक्य वाटूं लागली. युनिव्हर्सिटीने दिलेल्या विशेष सवलतीमुळे १५ मार्चपर्यंत तरी ही सर्व सिध्दता दाखविणे आम्हांला जरूर होते. मार्चमध्ये हे स्पष्टच झाले कीं, १९४६ साली कॉलेज सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रयत्नांची समाप्ति मार्च १९४६ अखेरच झाली. सोसायटीजवळ त्या वेळी फक्त ८०-८५ हजार रूपये शिल्लक राहिले होते.
मे १९४६ मध्वे सर्व प्रस्थापक सभासद एकत्र विचारविनिमयाकरितां जमले. व पुन: नेटाने प्रयत्न करावा असे ठरलें. या वर्षी सुरूवातीपासूनच श्री. जी. एन. गोखले यांचे मार्गदर्शन लाभले होते व सरकारी ९३ कलमी राज्यकारभार संपून कॉग्रेस मंत्रिमंडळ काम करूं लागले होते. म्हणून नवा प्रयत्न सुरू करताना नामदार बाळासाहेब खेर यांचा सल्ला घेऊन आपला बेत आखावा असें योजिले.