कॉलेज स्थापनेचा इतिहास - २

संवादी विचार मिळाल्याचें समाधान घेऊन मी घरी परत आलो, व ठरल्याप्रमाणे गुरूवारीं पुणे इंजिनिअरिंग कॉलेजात गेलो. तेथेंहि आम्हांस योजना करण्याचे कामीं अनुकूलताच दिसून आली. त्यानंतर तेथे तास दोन तास थांबून व थोडी माहिती घेऊन परत आलों. आम्हां उभयतांचे धोरण असें ठरले की, श्री. गोखले यांनी एक महिन्यांत योजना तयार करण्याचा प्रयत्न करावा, व मी एक लाख रूपयांच्या देणग्यांची आश्वासनें मिळविण्याचा प्रयत्न करावा. कारण मुंबई विद्यापीठाकडे नवें इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यासाठी अर्ज करावयाचा असला तर तो नेहमी ३१ ऑगस्टच्या आंतच करावा लागतो. याप्रमाणें कामाची वाटणी होऊन गुरूवारचा दिवस संपला. त्यानंतर महिनाभरांत श्री. गो. त्रिं. गोखले यांनी अत्यंत परिश्रम करून तपशीलवार माहिती घेऊन सुमारें १० ।१५ ऑगस्टपर्यंत योजना तयार करून दिली. माझ्या कांमातहि मला बरीच अनुकूलता दिसून आली. मी असें योजिलें होते कीं प्रत्येकीं दहा हजार रूपये देणारे सहा स्नेही निवडावे. त्याप्रमाणे एक ऑगस्टपर्यंत पुढील नांवे आश्वासन देणार्‍यात नमूद करतां आली.

(१) मी स्वत: - दहा हजार रूपये व
(२) मी केलेल्या कृ. ब. साठे ट्रस्टकडून - पंधरा हजार रूपये.
(३) श्री. ध. कृ. रानडे (रानडे ब्रदर्स कंत्राटदार) - दहा हजार
(४) श्री. श्री. गो. मराठे - दहा हजार
(५) श्री. ना. ग. रानडे (मे. व्ही. आर. रानडे अँड सन्स ) - दहा हजार
(६) श्री. चं. गो. आगाशे - दहा हजार
(७) श्री. एफ. डी. पद्मजी - दहा हजार
(८) श्री. माणिकचंद वीरचंद शहा - दहा हजार

हे त्यांचे म्हणणे मला व्यक्तिश: सयुक्तिक वाटलें ; तरी पण एक वर्षभर सतत प्रयत्न करण्याची चिकाटी माझेजवळ राहील अशी खात्री माझी मलाच वाटेना. म्हणून मीं माझ्या मनाशी असा निर्णय घेतला कीं, नवीन सोसायटी स्थापन करून तिच्यामार्फत चालू वर्षीच अर्ज करावयाचा. कारण नवीन सोसायटी स्थापन करून त्यांत अपयश येण्यांत विशेष धास्ती नाही. फिरून दुसरे वर्षी प्रयत्न करण्यास वाव रहातोच. शिक्षण प्रसारक मंडळीसारख्या स्थिर संस्थेने असा अर्ज करण्यांत धोका होता; म्हणून थोडासा अविचारच करून, नवीन सोसायटी स्थापन करण्याच्या विचारास मी लागलो.

सोसायटी स्थापन करण्याचे कामी प्रि. ज. र. तथा नानासाहेब घारपुरे यांची मदत घण्याचे मी योजलें व त्याचेकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी मला प्रोत्साहन देऊन या कामीं मदत देण्याचे कबूल केलें. पुण्यात चालू असलेल्या अनेक संस्थांपैकी दोन चार संस्थांच्या घटना त्यांचेकडे नेऊन दिल्या व माझ्या संस्थेच्या ज्या विशेष अडचणी होत्या त्याही त्यांना सांगितल्या. माझ्या संस्थेत कायम काम करणारे व संस्थेचा भार उचलणारे लाइफ वर्कर्स असे नाहीत ही मोठीच अडचण होती. अनाथ विद्यार्थि गृहाची घटना स्वीकारण्यास सोयीची अशी मला वाटली. अनेक संस्थांच्या घटनांचा तरतमभावाने विचार करून निर्णय घेण्याइतका अवधिही नव्हता, व तशी मला व्यक्तिश: आकलनशक्तिही नव्हती. म्हणून त्यांचेवरच हा सर्व भार सोपवून घटनेचा एक तात्पुरता आराखडा टाईप करून घेतला.

त्यांत देणगीदारांची नांवे प्रस्थापक सभासद म्हणून दाखल केली. व इंजिनिअर्सपैकी श्री. आर. जी. सुळे (रिटायर्ड चीफ इंजिनिअयर), श्री. दामुआण्णा पोतदार (उत्साही व तरूण मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअर), व श्री. जी. टी. गोखले यांचेहि प्रस्थापक सभासद म्हणून नांव घातलें. प्रि. नानासाहेब घारपुरे यांनी संस्थेत यावें अशी विनंती केली व ती त्यांनी मान्य केली. याप्रमाणे सर्व नांवे तयार झाल्यावर खूप वजनदार असा अध्यक्ष आपल्या संस्थेस मिळावा अशा हेतूने श्री. नानासाहेब घारपुरे यांच्या लॉ सोसायटीचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब जयकर हे आमच्या सोसायटीस अध्यक्ष म्हणून मिळावे असा प्रयत्न करण्याचे ठरलें व त्यास प्रि. नानासाहेब यांनी संमति दिली. श्री. बाबासाहेब जयकर यांचा मुक्काम श्री. नाथीबाई ठाकरसी यांचे बंगल्यावर होता. त्यांचेकडे प्रि. नानासाहेब घारपुरे हे मला बरोबर घेऊन गेले.

इतकीं आश्वासने ३१ जुलैच्या आंतच मिळालीं. राहिलेल्या वीस हजारांकरिता आणखी दोन नांवे शोधत होतों व तीं मिळतील अशी मनाला खात्री वाटत होती. मुंबई विद्यापीठाकडे कॉलेज काढण्याचा अर्ज करावयाचा तर त्याकरिंता एक स्वतंत्र सोसायटी स्थापन करावयास पाहिजे. परंतु हे सगळेंच नवे मुंबई विद्यापीठाला पटण्यासारखे होणार नाही. असे वाटल्यावरून शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे, यांचेकडे एक विनंतीपत्र पाठविले की आम्ही एक लाख रूपये जमवितो व आणखीही पुढें लागणारे ५-७ लाख रूपये जमवण्याचा प्रयत्न करतों ; परंतु कॉलेज काढण्याचा विद्यापीठाकडे करावयाचा अर्ज शिक्षण प्रसारक मंडळीनें पाठवावा. त्यावेळी शि. प्र. मंडळींचे चेअरमन श्री. तात्यासाहेब केळकर होते. त्यांनी व इतर सभासदांनी अत्यंत सहानुभूतिपूर्वक विचार करून असे कळविलें की, `शिक्षण प्रसारक मंडळींने अर्ज करावयाचा तर संस्थेजवळ पांच सहा लाख रूपयांची निश्चित आश्वासनें हवींत. त्याकरतां संस्थेच्या सहकार्याने प्रयत्न करावा व एक वर्षात इतकीं आश्वासने मिळवावी. हें काम हमखास होऊं शकेल. त्या बाबतीत संस्थेची जी मदत लागेल ती मिळेल.`