कॉलेज स्थापनेचा इतिहास - ३
प्रि. नानासाहेब घारपुरे यांच्या सहानभुतीमुळे आमच्या देणग्यांपेक्षांही अधिक महत्वाचा असा जागेचा प्रश्न इतकया सुलभतेने सुटण्याची आशा वाटूं लागली. हे सुमारे ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यांत घडलें. त्यानंतर आणखी दोन वजनदार गृहस्थ मिळविण्यास आठ दिवसांचा अवधि राहिला होता. त्याबाबत विचार करतां श्री. म. वि. भिडे यांचे नांव मला सुचलें. मी त्यांचेकडे संस्थेची घटना वगैरे घेऊन जाण्यांचे ठरविलें व संस्थेची घटना छापून झाल्यावर मी त्यांचेकडे घेऊन गेलो. त्यांची माझी यत्किंचितही ओळख नसतांना सहानुभूति दाखवून उद्या निर्णय देतों असें त्यांनी सांगितलें. आम्ही प्रस्थापक सभासदांनी प्रत्येकीं दहा हजार रूपये दिले आहेत हे त्यांनी वाचलेंच होतें. त्याची त्यांना थोडीशी अडचण होत आहे असें माझ्या लक्षात आले म्हणून मी त्यांना श्री. जयकरांचे भेटींत घडलेली हकीकत सांगितली.
आपल्या येण्यानें संस्थेचें महत्व वाढेल व उपयुक्तता अधिक वाढेल व तो लाभ आम्हीं देणगीपेक्षा अधिक समजतों. तेव्हा अनुकूल अभिप्राय द्यावा अशी विनंती करून आलों. ही पहिली भेट दिनांक ३१ ऑगस्टचे सुमारास झाली. त्यानंतर मला असे समजले की कर्नल एस. ए. फाटक यांचा श्री. भिडे यांचेशी चांगला परिचय आहे. तेंव्हा कर्नल एस. ए. फाटक यांचेकडे जाण्याचें ठरविलें. कर्नल फाटक यांचा माझा चांगला परिचय होता. आपल्या सेवानिवृत्तीनंतर ते तळेगांव येथील हॉस्पिटलमध्ये नि:स्वार्थीपणानें कित्येक वर्षे काम करीत असल्यामुळें आम्हां मित्रमंडळींच्या मनांत त्यांच्याबद्दल नितांत आदर असे. त्यांनी आमच्या कामी श्री. भिडे यांस भीड घालावी असें सांगण्यास आम्हांस संकोचहि वाटला नाही. आमच्या संस्थेंत दहा हजार रूपये देऊन तुम्हीही यावें असे सांगण्याचें अप्रशस्त धाडसही मी केलें. त्याबद्दल त्यांनी कौतुक करून श्री. भिडे साहेबांना मिळवून देण्याचें काम करण्याचें कबूल केले व स्वत:बद्दलचाही निर्णय एक दोन दिवसांत देतों असें सांगितलें.
याप्रमाणे दुसरे दिवशीं श्री. भिडेसाहेब यांची संमति घेण्यासाठीं मी त्यांची भेट घेतली. त्यांनी दहा पांच मिनिटें विचार करून संस्थेंत येण्यास संमति दिली. इतकेंच नव्हे तर संस्था सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपकरतां दहा हजारांची रक्कम ठेव म्हणून देण्याचा आपला मनोदय कळविला. संस्थेत आज प्रस्थापक म्हणून नांव दाखल केलें तरी ते इंदूर येथे न्यायाधीश म्हणून जाणार असल्यामुळें त्यांचा विशेष उपयोग होऊ शकणार नाही असाही इषारा त्यांनी दिला होता; परंतु त्यांचे वास्तव्य कायमचें पुण्यास असल्यामुळें त्यांचा लाभ आम्हांस घेतां येईल असे आम्हांस वाटत होते. कर्नल फाटक यांच्या शब्दामुळें श्री. भिडे यांची संमति मिळविणे सुलभ झालें याचा मला आनंद वाटला, म्हणून कर्नल फाटक यांचे आभार मानण्यास मी त्यांचे घरी गेलो. यांत आणखी एक हेतु त्यांचीही संमति मिळवावी असा होता. आणि मला त्यांची संमतिही मिळाली व दहा हजार रूपयांच्या देणगीचें आश्वासनही दुसरे दिवशी मिळालें. इतकी अनुकूल कृपादृष्टी परमेश्वराशिवाय कोणाकडूनही होणार नाहीं असेंच त्यावेळी मनास वाटलें.
२४ सप्टेंबरला त्यांच्या विम्याचे पैसे यावयाचे होते, त्यावेळी पैसे मिळतील असे कर्नल फाटक यांनी सांगितलें. याप्रमाणें संस्था स्थापण्यापूर्वी एक लक्ष रूपये जमविण्याचा माझा संकल्प सुलभतेनें सुटल्याचें पाहून मला काम करण्यास अत्यंत उत्साह वाटून परमेश्वरी कृपा आपल्या बाजूस आहे असा भासही झाल्यासारखें वाटलें. त्यानंतर कर्नलसाहेबांनी सवडीने आपली स्वत:ची हकीकत सांगितली ती अशी कीं, त्यांनी संस्थेत पैसे देण्याचे कबूल केलें ते त्यांस त्यांचे वडिलांनी स्वप्नांत येऊन तसें सागितलें.
ता. २७ ऑगस्टचे सुमारास मी मुंबईस गेलों असतांना विद्यापीठाकडे कसा अर्ज करावयाचा त्याचा मसुदा यार करण्यासाठी प्रि. घारपुरे यांचेबरोबर दोन-तीन तास खर्च केले. ते म्हणाले की आपण युनिव्हर्सिटीत जाऊन व्हाइस चॅन्सेलर यांना भेटून येऊ. त्याप्रमाणे व्हाइस चॅन्सेलर यांची भेट घेण्यासाठी ते मला घेऊन गेले. त्या वेळी न्या. वाडिया हे व्हाइस चॅन्सेलर होते. त्यांचा व नानासाहेब यांचा चांगला परिचय होता. त्यांना श्री. नानासाहेब यांनी सर्व कल्पना समजावून दिल्यानंतर 'प्रयत्न अवश्य करावा ; युनिव्हर्सिटीकडून सहानुभूति अवश्य मिळेल' असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांनी इषारा असा दिला की कमींत कमी पांच लक्ष रूपये असल्याशिवाय अशा कामाला हात घालणे धोक्याचें ठरेल. त्याबद्दल योग्य ती दक्षता तुम्ही घ्या. त्याबरोबर अनुकूल अशी एक बातमी त्यांनी दिली की दरवर्षी ३१ ऑगस्टलाच अशा कॉलेजसाठी अर्ज करावयाचे असतात ; तथापि यंदाचे वर्षीच विद्यापीठानें २५ तारखेंस असा ठराव केला आहे कीं से अर्ज करण्यास १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून द्यावी. त्यामुळे सोसायटी रजिस्टर करून अर्ज करण्यास पंधरा दिवसांचा अधिक अवधि मिळाला.