कॉलेज स्थापनेचा इतिहास - १

सोमवार ता. ९ जुलै १९४५ या दिवशी सुखासीन वृत्तींत असतांना दुपारी २ वाजतां सहज अशी कल्पना आली की इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याचा आपणहि प्रयत्न करावा. इच्छा एकदम कशी उद्भूत झाली याचा मागमूसही लागूं शकत नाही. कारण एप्रिल - मे १९४५ मध्यें माझे स्नेही श्री. द. गो. फडके, बी. व्ही. धडफळे इंजिनिअर व श्री. एस्. जी. भालेराव असे माझेकडे येऊन इंजिनियरिंग कॉलेज काढावें की काय याचा विचार करून गेले होते. त्या वेळी हे काम फार जबाबदारीचें, आपल्या आवाक्याबाहेरचें असे समजून आपण ते करूं शकत नाही असाच निर्णय सर्वांनी घेतला होता. त्यानंतर जूनमध्ये पुन: पुणे इंजिनियरिंग कॉलेजच्या प्रवेशाबाबत सर्व समाजाचीच होणारी अडचण याची सामाजिक चर्चेच्या स्वरूपाची चर्चा स्नेही मंडळींबरोबर होत असे. त्या वेळींही हे काम अतिशय दुर्घट अडचणींचे आहे असे मनाला पटत होते. या दोन प्रसंगांवरून ९ जुलैला असा एक फिरून विचार यावा अशी शक्यता दिसत नाही. तरी पण ती उद्भवली एवढाच अनुभव नोंदविता येईल.

हा विचार उद्भवल्यावर त्याने मनाची इतकी पकड घेतली की जवळजवळ अर्धा तास स्वप्नमय विचाराच्या प्रवाहांतच निमग्न होतों, अडीच तीन वाजतां काही तरी मनाचा निश्चय झाला. कॉलेज काढण्यासंबंधी जो आराखडा तयार करावयास पाहिजे, त्या दृष्टीनें मदत होण्यासारखे पहिले नांव सुचलें ते श्री. शंकर रामचंद्र भागवत यांचे. त्यांनी म्युनिसिपालटीत अनेक योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणलेल्या असल्यामुळे त्यांचा उपयोग कॉलेज स्थापनेच्या योजनेंत निश्चित होईल असे वाटून लगेच कपडे करून श्री. भागवत यांचे घरी गेलों. ते डेक्कन जिमखान्यावर गेल्याचें कळले, तेव्हां त्यांचे घराशेजारींच श्री. सखाराम विनायक आपटे यांचे घर आहे, तेथे गेलों. ते नुकतेच इंजिनिअरिंग कॉलेजातून निवृत्त झाले होते. त्यांचा माझा परिचय असल्यामुळें असे कॉलेज काढण्याबद्दलचा विचार त्यांना विनंती केली. त्यांनी सांगितले कीं अशी योजना तयार करण्याचे कामीं माझा उपयोग होणार नाही. कारण तसा विचार मीं केलेला नाहीं. परंतु कॉलेज निघालें तर माझा उपयोग शिक्षक म्हणून होऊं शकेल. त्यावेळी ते कॉलेज पुण्यांतच काढावें अशी दृढ कल्पना माझ्या मनांत होती.

त्यांचेकडून निघालों तो डेक्कन जिमखान्यावर श्री. भागवत यांची भेट घेण्यास गेलों. त्यांची भेट झाली व त्यांना मी आपली कल्पना निवेदन केली. त्या वेळी ते अनेक को. सोसायट्यांच्या हिशोबांच्या कामांत व्यग्र होते. तरी सुध्दां अर्धा तास वेळ देऊन त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. पण त्यांना अशा प्रकारचें डिग्री कॉलेज काढण्याची उपयुक्तता पटेनाशी झाली होती. त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की, `खेडेगांवांतील अनेकविध सुधारणा करण्याकरितां रूरल इंजिनिअरिंग सारखें शिक्षण देणारी संस्था असावयास पाहिजे. तशीं काही योजना असली तर माझा उपयोग होऊ शकेल. तुमच्या कॉलेजांतून उत्तीर्ण होणार्‍या व नोकरी शोधणार्‍या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज काढण्याची कल्पना मला तितकीशी पसंत नाही. म्हणून त्याची पुनरावृत्ति करण्याचे कॉलेजचे योजनेसाठी मी माझी शक्ती व बुध्दि खर्च करावी असें मला वाटत नाही.` त्यांचेकडून झालेली निराशा मोठीच होती. परंतु प्रयत्न सोडूं नये म्हणून श्री. आर. एस. गोखले यांचेकडे जाण्याचें योजलें. कारण मला असें कळले कीं, श्री. गोखले यांचे जवळ अशी काही तरी योजना तयार आहे. श्री. गोखले हे पुणे इंजिनियरिंग कॉलेजांत ड्रॉइंग विषय शिकवणारे शिक्षक होते. त्यांची भेट घेतां ते म्हणाले की, अशी स्कीम काढण्याइतका विचार मी केलेला नाही: तथापि निरनिराळया इंजिनिअरिंग कॉलेजांना लागणार्‍या इमारतींचे नकाशे मी तयार केले आहेत; किंवा जरूर लागली तर मी नवीन तयारही करून देईन. तेथे काही लाग लागला नाहीं म्हणून कोठें जावें असा विचारच पडला. टिळक रोड वरून जातां जातां श्री. जी. टी. गोखले यांच्याकडे जाण्याचा विचार मी अनपेक्षितपणेंच ठरविला. त्यांच्याकडे पांच वाजतां पोचलो. त्यांची भेट झाली. मी त्यांना माझे उद्दिष्ट सांगतलें व एकदम सर्वस्वी अनुकूल असा त्यांचा विचार माझ्या विचारांशी मिळाला. त्यांच्याहि मनांत असा कांहीतरी शिक्षणाचा उपक्रम केला जावा असा विचार असल्यामुळे अनाथ विद्यार्थि गृह संस्थेमार्फत इंजिनियरिंगचे शिक्षण द्यावें असे त्यांच्याहि मनांत होतें. तसा ते प्रयत्नही करीत होते. दोघांचे विचार जुळल्यामुळे त्यांनी मला मदत करण्याचे कबूल केले व लगेच पुढच्या गुरूवारीं दोघांच्या सोयीप्रमाणे पुणे इंजिनिअरिंग कॉलेजात जाऊन तेथील प्रोफेसरांनी भेटून योजना तयार करावी असे ठरले.