Late Prin. G. C. Kanitkar
प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख मायमराठी डॉट कॉम या वेबसाईटवर त्यांच्या स्मृतिदिनी प्रसिद्ध झाला होता तो खाली देत आहे.
-------------
प्राचार्य बापूसाहेब कानिटकर
मागच्या वर्षी एक नोव्हेंबरला बापूसाहेबांना नव्वदाव्वे वर्ष लागले. त्या प्रीत्यर्थ त्यांचे अभिष्टचिंतन-अभिनंदन करावे म्हणून सकाळी जरा लवकरच मी त्यांच्या बंगल्यावर गेले. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ मोठ्या भक्तिभावाने त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ’चंद्रमणी’ असे ठेवले होते. मी गेले तेव्हा ते नेहमीप्रमाणेच व्यवस्थित पोशाख घालून दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचीत बसले होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या लख्ख, गोर्या आणि भव्य कपाळावर कुंकू लावले आणि दोन गुलाबाची सुंदर फुले आणि एक सुबकशी छोटी वस्तु भेट म्हणून त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रसन्नपणे हसून त्याचा स्वीकार केला. नंतर मी त्यांना म्हटले, ’तुम्ही टेनिस खेळता हे मला माहिती आहे, क्रिकेटमध्येही खूप ’रन्स’ काढत होतात हे पण मी ऐकले आहे, आता जीवनाच्या खेळातले धावांचे शतक तुम्ही पूर्ण करणार, याबद्दल मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, मी आणि माझी कुटुंबीय मंडळी यांच्यातर्फे!’ त्यावर पुन्हा एकवार शांतपणे त्यांनी स्मित केलं आणि माझ्या मस्तकाला स्पर्श करुन मला आशीर्वाद दिला. पण नियतीला माझी ही प्रार्थना मान्य नसावी. कारण या घटनेला दोन महिने होतात न होतात तोच त्यांना देवाघरचे आमंत्रण आले ! तेही पहाटे पहाटेच !
समाजाला कै. बापूसाहेबांची ओळख आहे ती ते वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्रथम प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून ! तेथून ते सेवानिवृत्त झाल्यावर बुधगावच्या वसंतदादा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. त्या संस्थेचा परिसर विस्तृत असा त्यांनी एकदा जातीने हिंडून आम्हा मंडळींना दाखवला होता, सर्व माहिती तपशीलवार सांगितली होती. जयसिंगपूरच्या डॊ. मगदूम इंजिनिअरिंग महाविद्यालयातही प्राचार्याचीच जबाबदारी त्यांच्यावर होती. ते मेकॆनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्ही शाखांचे उत्तम इंजिनिअर होते. बनारस, बेंगलोर अशा नामवंत शहरात राहून त्यांनी या पदव्या मिळविल्या होत्या. त्यांचे या इंजिनिअरिंग क्षेत्रातले योगदान महत्वपूर्ण व मोलाचे होते. त्यामुळे त्यांच्या सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी दूरदूरहून माणसे येत असत.
बापूसाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले एक स्नेही म्हणाले, ’मालतीबाई, स्वर्गात गेल्यावरही बापूसाहेब स्वस्थ बसणार नाहीत. तिथेही ते एखादे इंजिनिअरिंग कॊलेज काढतील बघा!’
बापूसाहेबांमधला जातीवंत शिक्षक सदैव जागा असायचा. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर विश्रामबागेत राहणार्या मुलांना (व अर्थात जवळपासच्या परिसरातल्या मुलांनाही) शिक्षणासाठी सांगली-मिरजेला जायला लागू नये, गोरगरीब मुलांची इथे जवळच सोय व्हावी म्हणून त्यांनी १९७३ च्या सुमारास काही सहकार्यांच्या मदतीने ’विश्रामबाग शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. तिच्यामार्फत प्राथमिक-माध्यमिक शाळा सुरु केल्या. त्या शाळांतून आज पंचवीस वर्षांनंतर दोन हजारापेक्षा जास्त मुले-मुली शिकत आहेत. भिन्न भिन्न विचारसरणीच्या तसेच स्वतंत्र मते असलेल्या लोकांना एकत्रित करुन आर्थिकदृष्ट्या अवघड असा उपक्रम राबविणे हे काम काय सोपे थोडेच असेल? पण ते त्यांनी यशस्वीरितीने पार पाडले. या संस्थेवर त्यांचे अपत्यनिर्विशेष प्रेम होते. ही शिक्षणसंस्था माझ्यामते कै. बापूसाहेबांचे चिरस्मरणीय आणि स्फूर्तिदायक असे स्मारकच म्हणायला हवे!
एकूणच पाहता त्यांना शिक्षणप्रमाणेच विधायक आणि सर्जनशील अशा कामांत मनापासून रस होता. सांगली अर्बन को-ऒप. बॆंकेचे ते संचालक होते. विविध संस्थांच्या सभांना ते न चुकता हजर राहात, चर्चेत भाग घेत, आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तिथे सला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या संपन्न आणि सुदीर्घकाळाच्या अनुभवांचा त्यांनी अखेरपर्यंत समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला. अशा कार्यमग्नतेमुळेच सेवानिवृत्तीनंतरचाही त्यांचा काळ समाधानात, आनंदात गेला.
विश्रामबागेतील ज्येष्ठ नागरिकांची सभा बर्याचवेळा बापूसाहेबांच्या ’चंद्रमणी’ बंगल्यात भरत असे. त्या बंगल्यातल्या प्रशस्त, हवेशीर, देखण्या दिवाणखान्यात अनेक व्यवसायातील मंडळी जमून काव्यशास्त्र विनोदात रंगून जात. अशा सभांची गोडी आमच्या प्रिय शरयूने केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या, सुरळीच्या वड्या किंवा अशाच अन्य रुचकर पदार्थांनी आणखीनच वाढायची.
प्रिय शरयूप्रमाणेच (तिचे सासरचे नाव ’प्रतिभा’ आहे. पण मी तिच्या माहेरची! त्यामुळे मी तिला तिकडच्या नावानेच संबोधते) कै. बापूसाहेबांनी नियतीने देखणे, रुबाबदार व्यक्तिमत्व बहाल केले होते. त्यांची उंची बेताची व अंगलट काहीशी स्थूल होती. वर्णाने ते चांगले गोरेपान होते. भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीही पोशाखात प्रथमदर्शनीच पाहणार्याच्या मनावर त्यांचा प्रभाव पडे. ते मितभाषी आणि शिस्तप्रिय होते. अधिकारपदस्थ माणसांना मग ते कुटुंबातले असोत की संस्थेतले असो, प्रसंगी कठोर वा उग्रही बनावे लागते. त्यामुळे त्यांचा थोडा धाक आणि दराराही वाटे. पण अंतर्यामी ते खूप हळवे होते, मृदु होते. गौरी, गुड्डू (ही मी त्यांच्या नातवंडांची ठेवलेली नावं) किंवा घरातले अन्य कोणी यांना दोन दिवस साधा थंडीवार्याचा ताप आला, तरी आतून ते फार अस्वस्थ असत. शरयूचे घर इंजिनिअरिंग कॊलेजात असताना तिथून परतायला मला उशीर झाला, तर ते जातीने मला घरी सोडायला येत.
मला काही लहान-मोठे वा मौल्यवन असे खरेदी करायचे असले की मी शरयूबरोबर जायची. पुष्कळदा बाजारहाट करुन यायला बराच उशीर व्हायचा. दुपारची जेवणाची वेळ टळून गेलेली असायची, तरीही बापूसाहेब शरयू आल्याशिवाय कधीही जेवायचे नाहीत. आमच्या उशिरा येण्याबद्दल ते कधी रागावलेलेही मला आठवत नाही. या गोष्टी वरवर पाहता छोट्या वा साध्या दिसतात, पण अशा छोट्याछोट्या आणि भावपूर्ण गोष्टींनीच पती-पत्नींच्या सहजीवनाचा प्रेममय, सुंदर गोफ विणला जात असतो. आयुष्यभर एकात्म मणाने, परस्परांचा आदर करीत, एकमेकांना समजावून घेत जीवन जगणारे शरयू-बापूसाहेब हे जोडपे सर्वांनाच आदरणीय वाटे. या उभयतांनी व त्यांच्या कुटुंबियांनी विश्रामबागेतल्या माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात माझ्या सर्व सुखदुःखात माझ्यावर मायेची शाल पांघरली.
जेव्हा जेव्हा आमची ’नन्नी’ (माझी आई) मला इथे भेटायला येई त्यावेळी शरयूच्या पाठीवर धप्पदिशी थाप मारुन तिला म्हणायची, ’तुम्ही दोघं, तुमचं घर इथे आहे म्हणून मालीची आम्हाला काळजी वाटत नाही हो.’
बापूसाहेबांचा दिनक्रम रेखीव असायचा! प्रातःकाळी उठून घराचे फाटक उघडून ते हौसेने दूध घेत, चहापाणी-स्नान आदी आन्हिक उरकले की नऊ-साडेनऊला व्यवस्थित नास्ता करीत, न चुकता भोजनापूर्वी नवनाथाची पोथी वाचीत व नंतर मोठ्या निगुतीने ती रेशमी रुमालात बांधून ठेवीत. देवावर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. त्यांच्याकडे गणपती दीड दिवसाचा त्याची दुर्वा-सुपारी-कापूर, उदबत्ती, प्रसादापासून सर्व जय्यत तयारी शरयूने केली असली तरीही त्यांचे सर्वत्र बारीक लक्ष असे. कापर्या हातात पुजेचं तबक घेऊन सर्व आरती ते म्हणत. धार्मिक सणांना गडद-लाल कद नेसत. पूजाअर्चेनंतर भोजन-वामकुक्षी-चहा, शनिवारी उभयतांचा उपवास म्हणून साबुदाण्याची खिचडी खाऊन दूरदर्शनवर खेळ, बातम्या जे आवडेल ते दिवसभरात बराच वेळ पाहात. ’वालचंद’ला येण्यापूर्वी ते ’सरस्वती सिने टोन’ साऊंड इंजिनिअरचे काम पाहत. त्यामुळे व्ही. शांताराम, भालजी, सुलोचना बाई आणि अशीच कितीतरी चित्रपटसृष्टीतली मातब्बर मंडळी त्यांच्या चांगल्या परिचयाची ! त्यांचे चित्रपट, नाना आठवणी सांगत, ते आवर्जून पाहात असत.
संध्याकाळी येणार्या-जाणार्यांबरोबर माफक गप्पा, फार लांब चालवत नसे तेव्हा घरा शेजारच्या दुकानातून भाजी-ब्रेड आणणे, कधी मिरजेला शरयूसह आप्त मंडळींकडे फेरी मारणे, असा दिवस घालवून रात्री हलकेसे जेवण करुन ते झोपायचे. जेवणात ना कसली त्यांना खोड ना जीवनात कसलेही व्यसन! त्यामुळे दीर्घायुष्याचे वरदान त्यांना ईश्वराने दिले. वयोमानानुसार अधून-मधून काही तक्रारी उदभवत. पण त्यांन अतिशय सोशिकपणे व शांतपणाने ते विवेकाने तोंड देत.
कै. बापूसाहेब-शरयू यांच्या व माझ्या घरात केवळ काही फुटांचेच अंतर आहे. त्या घरी मी कितींदा जायची. त्याला हिशेबच नाही. कारखान्याच्या डिपॊझिटचे काम असो की नारळ काढणार्याला किती रक्कम द्यायची हे ठरवायचे असो, बापूसाहेबांना मी सल्ला विचारत असे. कसलाही कंटाळा न करता ते मला सल्ला देत. आज ते आठवताना माझे मन त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भरुन येते आहे. एक-दोन दिवस माझी फेरी झाली नाही तर प्रकृती बघायला शरयूबरोबर तेही आस्थेवाईकपणे येऊन चौकशी करीत. म्हणून त्या उभयतांना विश्रामबागमधील माझे ’पालक’ असेच मी मानते.
सुमारे वीस वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या ’पसायदान’ बंगलीचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले! वास्तुशांतीची तारीख ठरुन संबंधितांना आमंत्रण पत्रे गेलेली आणि नेमक्या त्याचवेळी आमचे कॊन्ट्रॆक्टरसाहेब पूर्वसूचना न देता काश्मीरला की कुठे प्रवासाल गेलेले ! आता आली का पंचाईत! मी तरी पार गडबडून गेले. कामाचे आता काय होणार म्हणून ! त्यावेळी कै. बापूसाहेब आणि माझ्या घराचे डिझाईन करणारे सुप्रसिध्द स्टक्चरल आर्किटेक्ट आनंदराव साळुंखे माझ्या अंगणात खुर्च्या टाकून आपला बहुमोल वेळ खर्चून बसून राहिले व कामगारांकडून त्यांनी उर्वरित काम करुन घेतले. माझ्या वास्तुशांतीच्या यशात या दोघांचा वाटा सर्वात मोठा आहे, तो मी कधीच विसरणार नाही.
गरजू माणसांना मग तो नोकर असो, आप्त असो की अपरिचित निर्धन माणूस असो, बापूसाहेब आपला मदतीचा हात कसलाही गाजावाजा न करता त्यांच्यासाठी पुढे करीत. असे करताना आर्थिक फटका व कटु अनुभवाचे धनीही त्यांना कधीकधी व्हावे लागले, पण त्यामुळे त्यांनी आपले मन कडवट होऊ दिले नाही.
बापूसाहेबांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि राष्टाबद्दलच्या प्रांजळ भक्तीची दोन उदाहरणे माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांच्या एक वडील बहीण अविवाहित होत्या, अशक्त होत्या. त्या जन्मभर भावाजवळच राहिल्या. आठ-दहा वर्षांपुर्वीच त्या गेल्या. त्यावेळी बापूसाहेबांचे वय ऐंशीच्या घरात होते. म्हणून त्यांनी घरीच रहावे, अशी विनंती आप्तस्वकियांनी करुनही ते बहिणीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आणि पुढचे सर्व विधीही यथासांग केले. त्या गंगुताई अधून मधून माझ्या घरी आल्या म्हणजे म्हणायच्या, "मालूताई, माझा भाऊ कोहिनूर हिरा आहे." दुसरी आठवण आहे ती सुमारे ३५-४० वर्षांपुर्वीची ! सांगली-मिरज ही सर्वांना फार उपयोगी असलेली आगगाडी सरकारने तडकाफडकी बंद केली ! त्यामुळे विद्यार्थ्यांपासून व्यापार्यांपर्यंत सर्वांनाच फार गैरसोय सोसावी लागली. ती गाडी पुन्हा सुरु व्हावी म्हणून अनेक नामवंत प्रतिष्ठीत नागरिक खटपट करीत होते, पण सरकारच्या आडमुठेपणापुढे कुणाचे काय चालणार? ती खटपट करणार्या लोकांना काही महत्वाचे नकाशे तातडीने करुन हवे होते, हातात फार थोडा वेळ असूनही बापूसाहेबांनी ते नकाशाचे काम तत्परतेने करवून घेतले आणि संबंधितांकडे सर्व साहित्य पोहोचविले. एखाद्या कामाची आवश्यकता व निकड त्यांना पटली म्हणजे ते काम होईपर्यंत बापूसाहेबांना चैन पडत नसे. हा गुण आज एकूण दुर्मिळच झालाय.
बापूसाहेब तसे हौशीही होते. त्यांच्या इंजिनिअरिंग कॊलेजात नवीन कसले यंत्र की काय आणले होते. त्यावर छान आईस्क्रिम होई. एक दिवस त्यांच्या सांगण्यावरुन मी दूध+आंबा+साखर आदी मिश्रण करुन त्यांच्याकडे पाठवले तर काय गंमत! अर्ध्या-पाऊण तासांत रुचकर सुवासिक आईस्क्रिम घेऊन त्यांचा नोकर माझ्या दारात उभा! आनंदाची देवघेव करण्याची ही त्यांची वृत्ती मला खूपच काही शिकवून गेली.
बापूसाहेब हिंदू धर्म, संस्कृती, इतिहास, परंपरा यांचे गाढे अभिमानी होते. आपल्या पडत्या काळात ज्यांनी आपल्याला मदत केली, अशी आपली दिल्लीस राहणारी मोठी बहीण व मेहुणे यांना ते फार मानीत. नाशिक हे त्यांचे मूळ गाव. तिथल्या आठवणी ते खूप सांगत. देशाच्या सध्याच्या दुरवस्थेचे त्यांना अतिशय दुःख वाटे. पण आपण वयाच्या अशा टप्प्यात आहोत की ती स्थिती बदलण्याच्या दृष्टीने फारसे काही आपल्याला करता येत नाही, हे जाणून ते ती उद्विगता गिळून टाकत.
बापूसाहेबांच्या या जीवनचित्रांत प्रिय शरयूचे स्थान महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती सर्वार्थाने त्यांची नमुनेदार सहचारिणी होती. संसारात तिच्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदार्या तिने समर्थपणे पार पाडल्या. तीही मितभाषी, शांत, सोशिक आहे. कष्टाळू, समंजस आहे. अनेक खेळांत पटाईत आहे. तशीच हाडाची कलावंतही आहे. भाज्या आणि फळे यांचे सुंदर देखावे बनविण्याचे तिने महिला मंडळात सांगलीत एकदा सुरेख प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. ते मला चांगले आठवते. नाटकांत ती छान काम करते. हिंदीच्या परीक्षाही तिने दिल्या आहेत, सुगरण तर ती आहेच, विणकाम-शिवणकाम म्हणजे तिचा जणू श्वासोच्छवासच आहे. इंजिनिअरिंग कॊलेजच्या महिला मंडळात चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाचा थाट मोठा बहारीचा असे. वर्तमानकालीन सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर एखादा शोभिवंत देखावा तिथल्या भगिनी उभा करीत. एकजुटीने व तळमळीने करीत. त्यात या प्रतिभाताई कानिटकरांचा सहभाग, सल्ला भरपूर असे. बापूसाहेबांना आपल्या कलावंत पत्नीच्या गुणांचे कौतुक होते. त्या देखाव्यासाठी लागणार्या लहानमोठ्या कितीतरी गोष्टी ते हौसेने कॊलेजमार्फत करुन देत. बापूसाहेबांच्या सुखी सहजीवनात शरयूचा वाटा मोठा आहे, असे मी म्हणते ते काय उगीच? संसाराची धुरा तिने जवळजवळ ६०-६५ वर्षे सांभाळल्याने बापूसाहेबांना इतर कामांसाठी वेळ मिळाला! त्यांच्या जाण्याने ती बरीच एकाकी झाली हे खरे, पण ते एकाकीपण आजही काहींना काही कामात, वाचनात, मन गुंतवून ती सह्य करुन घेते!
बापूसाहेबांनी कृतार्थ मनाने जीवनाचा निरोप घेतला, आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक जगात ते नामवंत झाले. सौ. प्रिय शरयूसारखी सद्गुणी, विवेकी पत्नी त्यांना लाभली. डॊ. सौ. शशिकला, इंजिनिअर सौ. नीलप्रभा, एम. ए. झालेली सौ. वासंती यांना अनुरुप सहचर लाभले. मुला-मुलींचे संसार बहरले-फुलले, नातवंडे-परतवंडे पाहिल्याने सोन्याची फुले उधळून घेण्याचे भाग्य त्यांना मिळाले. धाकटा कुशाग्र बुध्दीचा सुपुत्र श्रीराम कानिटकर आज डिप्लोमा इंजिनिअरिंग कॊलेजाचा प्राचार्य झाला आहे. सून डॊ. सौ. संपदा कर्तबगार व कुशल दंतवैद्य म्हणून महाराष्ट्राबाहेरही गाजते आहे. मोठी सून डॊ. सौ. हेमा दामले समाजशास्त्राची डॊक्टर आहे, प्राध्यापिका आहे. नातवंडे-परतवंडे घराण्याच्या सत्किर्तीत खूप भर घालताहेत. या सार्यांचा लौकिक ऐकत, त्यांना आशीर्वाद देत, कुणाचीही सेवा न घेता बापूसाहेबांनी देवाघराकडचे प्रस्थान ठेवले. असे भाग्य कितीजणांच्या वाट्याला येते? या सुंदर जीवनचित्रावर नियतीने एक भलामोठा खिळा ठोकला होता तो बापूसाहेबांचा सर्वात हुशार इंजिनिअर मुलगा अरविंद याच्या अकाली मृत्युचा! पण हा वज्राघात बापूसाहेब-शरयूंनी फार विवेकाने-धीराने सोसला! असे त्या उभयतांबद्दल किती लिहावे !
जगद्विख्यात नाटककार शेक्सपिअरनं जगाला रंगभूमीची यथोचित उपमा दिली आहे. कै. बापूसाहेबांनी आपल्या वाटयाला आलेल्या सर्व भूमिका सुविहीतपणे पार पाडल्या. त्यांना आज पुन्हा माझे एकवार नम्र अभिवादन !