वालचंदमधील माझे वास्तव्य-प्रा. ह. उ. कुलकर्णी

 जून १९५३ मध्ये मी सांगलीच्या न्यू इंजिनिअरिंगमध्ये १७० विद्यार्थ्यामध्ये गुणवत्तेनुसार प्रथम क्रमांकाने प्रवेश घेतला. माझ्या शिक्षणासाठी दहा रुपयेसुद्धा देण्याची अर्थिक परिस्थिती माझ्या वडिलांची नव्हती, तरीसुद्धा मी धाडस करून सांगलीला आलो. अनेकांच्या सहाय्यांने मी तीन वर्षाचा कोर्स पुरा केला.जिआलाजीचे प्रा.आपटे चार खोल्यांच्या बंगल्यात एकटेच रहात होते.त्यानी मला एका खोलीत रहाण्यास परवानगी दिली. प्राध्यापकानी त्यांची पुस्तके मला घरी अभ्यासाला दिली. त्यावेळी असलेल्या तीनही वर्षाच्या अंदाजे ५०० विद्यार्थ्यामध्ये अर्धी चड्डी घालून शिक्षण पुरा करणारा मी एकमेव विद्यार्थी होतो. १९५५साली महाविद्यालयाचे नाव बदलून ते वालचंद कॉलेज आॉफ इंजिनिअरिंग असे झाले. शेवटच्या वर्षाचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालयात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर एका तासाच्या आत मला लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली. हे महाविद्यालय होते म्हणूनच मी अभियंता होऊ शकलो. म्हणूनच माझे महाविद्यालयावर नितांत प्रेम आहे.


           जून १०५६ ते मे १९५७ असे एक वर्ष सिव्हिल विभागात नोकरी केली. त्यावेळी मला पटवर्धन ब्लाकमध्ये पहिल्या मजल्यावरील दोन खोल्या रहावयास मिळाल्या. मे १९५७ मध्ये एच.सी.सी.लिमिटेड या कंपनीत डिझाइन इंजिनियर म्हणून मुंबई येथे नोकरी मिळली. मुंबईची हवा मानवेना,म्हणून ती नोकरी सोडून पुन्हा महाविद्यालयात जानेवारी १९६० मध्ये लेक्चरर  म्हणून कामाला लागलो. रेनबो क्वार्टर्स मधील एक खोली रहावयास मिळाली. १९६२ ला विवाह झाल्यानंतर प्राचार्याच्या जुन्या बंगल्यामागील तीन खोल्यांचे घर मिळाले.१९६४ ला प्रा.अनन्तस्वामी सोडून गेल्यानंतर प्रा.फाटकांच्या शेजारचे घर मिळाले.प्राचार्य केळकरानी स्टाफ़ रिक्रिएशन क्लबची जबाबदारी माझ्यावर सोपवली. टेबलटेनिस,कॅरम,बुध्दिबळ,रिंगटेनिस असे खेळ व ब्रिज खेळासाठी दोन तीन टेबल्स यांची योग्य व्यवस्था केली. शिवाय प्रत्येक महिन्यात आवारात रहाणार्‍य़ा प्राध्यापकाच्या कुटुंबियासाठी एक पार्टी ,असे काम मी सात आठ वर्षे केले.

१९६९ साली एम.ई.सिव्हिल(स्ट्रक्चर्स),ही परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर प्राचार्य कानिटकरानी परिसरासाठी मेंटेनन्स डिपार्टमेंट सुरू केले व त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली.एक सुतार,एक गवंडी,दोन माळी,निरनिराळ्या कामासाठी दहाबारा गडी,यांचेकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझेवर पडली. महाविद्यालयाच्या सर्व इमारती,स्वच्छता गृहे,स्टाफ़ क्वार्टर्स,सर्व बागबगीचे यांची देखभाल करताना मी वेळेकडे पाहिले नाही. माझे लेक्चर्सचे काम संभाळून मी ही सर्व कामे करीत होतो.१९७१ला जुनी दर्शने होस्टेल्समध्ये बराच फ़ेरफ़ार करून त्याठिकाणी चार घरे तयार केली व त्याला साठे निवास असे नाव दिले गेले व १९७२ ला प्रा.फाटक,प्रा,सुब्बाराव,प्रा.संतपूर व मी असे चौघे त्या घरात रहावयास गेलो.


                       डिप्लोमा,डिग्री,पदव्युत्तर विद्यार्थी अशा सर्व स्तरातील विद्यार्थ्याना शिकवण्याची संधी मिळाली.सप्टेंबेर १९८१ मध्ये उपप्राचार्य (प्राचार्य तंत्रनिकेतन) या पदावर निवड झाली.या पदाला पूर्ण न्याय देऊन मार्च १९९३ ला सन्मानाने निवृत्त झालो.जून १९९३मध्ये निवॄत्त अध्यापक मंडळाची स्थापना केली.१९९५ मध्ये माजी विद्यार्थी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड झाली.


             १९५३ ते १९९३ अशी ४० वर्षे महाविद्यालयाच्या परिसरात माझे जीवन सत्कार्यी लागले.हे महाविद्यालय होते म्हणून मी अभियन्ता होऊ शकलो. म्हणूनच माझे या महाविद्यालयावर नितांत प्रेम आहे.