पारिशवाड सर :असामान्य व्यक्तिमत्त्व

पारिशवाड सर : सामान्यांना देखील आपले वाटणारे असे अपवादात्मक असामान्य आणि धीरोदात्त व्यक्तिमत्त्व

केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य परिस्थितीतून पुढे येऊन IISc सारख्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेतून उच्चविद्याविभूषित होऊन सर्वार्थाने उन्नत झाल्यानंतर देखील आपला अंगभूत साधेपणा न सोडणारे आणि कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करणारे सर हे एक लोकविलक्षण अशी व्यक्ती होते. फेब्रुवारी २०१४ ते मे २०१६ ह्या सुमारे सव्वादोन वर्षांच्या त्यांच्या वालचंद कॉलेजच्या संचालकपदाच्या सुरुवातीच्या काळामध्ये माझा त्यांचा अत्यंत निकटचा संपर्क आला. त्या काळात मला प्रकर्षाने जाणवलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बऱ्याच असामान्य अशा गुणांचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न -

इतक्या उच्चपदावर विराजमान झालेली उच्चविद्याविभूषित व्यक्ती ही इतकी साधी असू शकते हे आजच्या काळात दुर्मिळच. बऱ्याचदा एकतर लोक बडेजाव मिरवतात किंवा साधेपणा ही एक प्रदर्शनीय बाब असल्यासारखे इव्हेंट मॅनेजमेंट करतात. पण पारीशवाड सर हे खरोखरच लालबहादूर शास्त्रींच्याप्रमाणे खरोखरच साधे होते. आमच्या दिल्ली दौऱ्यात एकदा अत्यंत आणि अवास्तव अशा महागड्या हॉटेलमध्ये गेल्यावर तेथील मेनूकार्ड बघितल्यानंतर जरी हा अधिकृत दौरा असला आणि खर्च हा महाविद्यालयाला कडूनच होणार होता तरीही प्रत्यक्ष संस्थाप्रमुख असूनही तिथे अनावश्यक उधळपट्टी न करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो ह्या संस्कृत सुभाषिताचा खरोखरचा प्रत्यय आणून देणारा असा होता.

ऐहिक जगात जगत असताना संत तुकारामांच्या जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ह्या ओवीचे प्रत्यक्ष आचरण सर करीत होते. दररोज घरी नित्यपूजा करणारे असे अत्यंत धार्मिक व पापभीरू प्रवृत्तीचे सर हे त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा वेध घेण्याइतकी आधुनिकता देखील बाळगून होते!

अत्यंत साधे, सरळ, सहज, संयमी, स्थितप्रज्ञ, निष्कपट आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्वाचे सर हे तितक्याच निधड्या छातीचे होते. किंबहुना वालचंदवरील मोठ्या आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी सरांसारख्या निधड्या व्यक्तिमत्त्वाची वालचंदच्या संचालकपदी नियुक्ती ही एक ईश्वरी योजनाच होती की काय असा प्रश्न पडतो कारण ग्रहणस्पर्श झाल्यानंतर २०१४ मधील सरांचे आगमन, ग्रहणस्थिती वाढत वाढत आलेली २४ मे २०१६ ते २३ जून २०१६ मधील खग्रासस्थिती आणि ग्रहणमोक्षकाळ अगदी जवळ आला असताना सरांचे फेब्रुवारी २०१९ मधील प्रस्थान पाहता ईश्वरी योजना वगळता अन्य सर्व तर्क हे येथे तग धरूच शकत नाहीत. लालबहादूर शास्त्री यांच्याप्रमाणेच सरांचे वैयक्तिक चारित्र्य हे निष्कलंक असल्यामुळेच मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास| कठीण वज्रास भेदू ऐसे|| असाच प्रत्यय ह्या बाबतीत सर्वानाच आला.

अत्यंत विचारी, संयमी, सर्वसमावेशक आणि अभ्यासू अशीच त्यांची निर्णयप्रक्रिया होती. अनावश्यक आक्रमकपणा, हडेलहप्पी आणि घाईगडबड ते प्रकर्षाने टाळत असत. जरी विरोधकांनी टीका केली तरी नरसिंहराव यांच्याप्रमाणेच काही बाबतीत गडबडीचा निर्णय टाळणे हा एक निर्णयच ते घेत असत.

मृत्यू हा अटळच आहे तरीही मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा ह्या गदिमांच्या ओळींची जाणीव सरांच्या दुर्दैवी निधनाची बातमी ऐकल्यावर पुन्हा एकदा प्रकर्षाने झाली.

एका खुल्या पुस्तकाप्रमाणे असलेल्या आणि कुठलाच चुकीचा उद्देश नसल्यामुळे सर्वच कृती ह्या श्वासासारख्याच सहजतेने करणाऱ्या सरांच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सरांचा हा जन्म मोक्षमार्गावरील प्रवाश्याचा अखेरचाच मुक्काम होता ह्यात शंकाच नाही. मृत्यूनंतरचा मोक्षपदी पोहोचण्याचा त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला असून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे येत्या काही दिवसातच ते अंतिम मोक्षपदी पोहोचतील. त्यामुळे आता शोक न करता सरांच्या मोक्षपदासाठीच्या अखेरच्या आनंदयात्रेचा धीरोदात्तपणे व सम्यक दृष्टीने साक्षीदार होणे हीच सरांना खरी श्रद्धांजली ठरेल!

- नारायण मराठे,
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली

मोबाईल - 9822344643