कै. प्राचार्य स द. फाटक
एक अलौकिक व्यक्तिमत्व - फाटक सर |
वालचंद कॉलेजमध्ये शिकत असताना, मला विशेष न कळणार्या विषयातले एक तज्ञ व ज्येष्ठ प्राध्यापक एवढाच परिचय माझा फाटकसरांशी झाला होता. त्यांचा पांढरा शुभ्र पेहराव व भारदस्त चालणे यामुळे त्यांचे वेगळेपण लगेच जाणवे. त्यांची अध्यात्माची आवड, साधेपणा आणि शिस्तीचा आग्रह यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांतही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. |
मी कॉलेजात नोकरीस लागल्यानंतर, माझे जेष्ठ सहकारी ज्या ‘नानासाहेब’ या सलगीच्या नावाने त्यांच्याशी बोलत असत तेवढ्या सलगीने वा मोकळेपनाने त्यांचेसी बोलणे मला जमत नसे. कारण माझ्या दृष्टीने ते ‘सर’ होते. मात्र त्यांच्याशी अधिक परिचय झाल्यावर मात्र त्यांच्या मित्रत्वाच्या व मिष्किलपणे बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी मला केव्हा आपलेसे केले हे कळलेच नाही. प्राचार्य झाल्यानंतरही त्यांनी ती जवळीक तशीच कायम राखली. पुढे प्राचार्यांच्या बंगल्याशेजारी मेनगेटजवळ मी राहणेस आलो आणि त्यांचेशी माझा शेजारी म्हणून अधिक संपर्क आला. प्रा. सुब्बाराव, संतपूर, जोगळेकर यांचेकडे ते बर्याच वेळा गप्पा मारण्यास येत तेव्हा मीही नकळत त्यांत सामील होत असे. त्यातूनच मला त्यांच्या स्वभावातील मनमिळाऊपणा, प्रसन्नवृत्ति आणि कोणासही त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्याची वृत्ती यांचे दर्शन झाले. |
त्यांच्या बोलण्याची पद्धत मोठी आकर्षक होती. ते एखादेच वाक्य बोलत. पण त्यातून हास्याची लहर उमटवीत. त्या वाक्यात थट्टा असे. पण उपरोध वा बोचरेपणाचा अंशही नसे. त्यांच्या बोलण्यावर हसता हसता आपल्याला आपली चूक उमजे, नवीन मार्गदर्शन मिळे. स्फूर्ति येई. ए. आर. ई.मधील उद्योजक मंडळींसमवेत चर्चा करताना मी त्यांना पाहिले होते. त्यांत संयमी श्रोत्याची भूमिका घेऊन ते सर्वांच्या कल्पना ऎकून घेत व नंतर अप्रत्यक्षपणे नेहमीच्या बोलण्यातून ते मार्गदर्शन करीत. तेही अशारीतीने की, इतरांच्या विचारांना चालना मिळावी व त्यांच्याकडून नव्या कल्पना याव्यात. यात स्वत: अलिप्त राहून इतरांच्या सृजनशक्तीला वाव देणे व वळण लावणे हा त्यांचा उद्देश असे. ---- डॉ. सु. वि. रानडे |
‘अरे आता प्रत्यक्ष कामाला लागा. आपल्याला राष्ट्रवाद किती जमतो हे आपण कृतीने दाखवू या. गप्पा मारून काय मिळणार? आजपासून गप्पा बंद करा, भारतात काय घडावे हे तुम्ही सांगू नका. तुम्ही एकत्रितपणे काय करू शकता हे दाखवून द्या. तुम्ही तरूण आहात. आव्हान पेलून दाखवा. टीका करू नका, काम करा. काही नवीन डिझाईन, उत्पादन करून संशोधकवृतीला वाट करून द्या. त्यातून उद्योगधंदा उभा राहू द्या.’ ‘आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इकडे तिकडे विखुरले आहेत, विखुरणार आहेत. मोठमोठी कामे करणार, मानाच्या जागा मिळविणार. हीच आपली प्रतिष्ठा. शेवटी प्रतिष्ठा म्हणून बोलणारे नि मोजणारे हेच लोक. म्हणजे आपलेच विद्यार्थी आणि त्यांची प्रतिष्ठा म्हणजेच पर्यायाने आपली प्रतिष्ठा. जसे हे विद्यार्थी वाढतील मोठे होतील तशी पर्यायाने कॉलेजची व विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढेल. प्रत्येक विद्यार्थ्याने हीच जाण ठेवली पाहिजे. |
प्रा फाटक इ. स. १९५६ मध्ये वालचंद कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल विभागात पाध्यापक म्हणून रुजू झाले. १५ जुलै १९७५ रोजी प्राचार्य गो. चिं. कानिटकर निवृत्त झाल्यावर प्रा. फाटक यानी प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. ए. आर. ई. उद्योगाचे ते मुख्य प्रेरणास्रोत होते.९ आक्टोबर १९८१ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे दुख:द निधन झाले. |