निवृत्तीनंतरचे विविधतेने नटलेले जीवन
जीवनात बालपण, तरुणपण, नंतर नोकरी किंवा व्यवसाय,यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. त्यामुळे प्रत्येकाला हवे तसे जीवन जगता येत नाही. पण निवृत्तीनंतर किंवा प्रौढपणी जीवन कसे घालवावे, कार्यरत राहून आनंद कसा मिळवावा, हे प्रत्येकाच्या हातात आहे. अनंत मार्ग उपलब्ध आहेत. कोणत्या मार्गावर कसा व किती आनंद घ्यावा, हे प्रत्येकाच्या हातात आहे. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. त्यासाठी मी कोणताही उपदेश किंवा मार्गदर्शन करणार नाही. मी स्वतः लहानपणापासून विविध क्षेत्रात काम केल्याने निवृत्तीनंतरचे माझे जीवन कार्यरत ठेवले व भरपूर आनंद घेतला व आज ८८ व्या वर्षीही आनंद घेत आहे हे वाचून आपली उत्सुकता जागृत झाली असेलच. म्हणून माझी कृतिशीलता सविस्तरपणे देत आहे. ही कृतिशीलता वाचून काहीजण त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात झेप घेऊन कृतीशील राहून आनंद घेतील, म्हणूनच हा लेखप्रपंच.
१) उपाध्यक्ष नूतन बुद्धिबळमंडळ सांगली
१९९३ च्या मार्च महिन्यात ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रनिकेतनचा प्राचार्य म्हणून निवृत्त झालो. आठच दिवसात नूतनबुद्धिमंडळाचा सदस्य झालो. सहा महिन्यातच मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. प्रत्येक मे महिन्यात ८,१०,१२,१४,१६ व १९ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा,महिला स्पर्धा, झटपट बुद्धिबळ स्पर्धा, व आंतरराष्ट्रीय रेटिंग स्पर्धा अशा ९ स्पर्धा होत होत्या. माझ्या ३७ वर्षाच्या महाविद्यालयातील कामाच्या आयोजनातील अनुभवामुळे मंडळाने माझ्यावर या स्पर्धांची बरीचशी जबाबदारी सोपवली. हे काम आनंदाने स्वीकारले व
नियोजनात यशस्वी झालो. “कुलकर्णी सरांनी आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शिस्त लावली”,अशा मंडळाच्या अध्यक्षांच्या उदगारांमुळे मिळालेला आनंद अवर्णनीय म्हणावा लागेल. हे पद पाच वर्ष सांभाळले.
२) संस्थापक अध्यक्ष - निवृत्त प्राध्यापक मंडळ
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची संघटना सुरु केली. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकत्र जमावे, गप्पागोष्टी, त्यानंतर भोजन असा कार्यक्रम जून १९९३ पासून सुरु आहे. सुरवातीला सात प्राध्यापक होते. आज या मंडळाचे ३५ प्राध्यापक सदस्य आहेत. आजपर्यंत ३२० मिटींग्स म्हणजे ३२० वेळा आम्ही सर्वजण पत्नीसह एकत्र जमलो व एकमेकला भेटण्यातला आनंद घेतला व यापुढे घेणार आहोत.
३) अध्यक्ष -परिसंवाद नियोजन समिती
सांगलीच्या इंजिनीअर्स अँड आर्किटेक्टस असोसिएशनच्या १९९४ साली झालेल्या Earthquake resisting structures या विषयावरील परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली, व या विषयातील भारतातील तज्ञ अभियंत्यांना बोलावून दोन दिवसांचा परिसंवाद यशस्वी केला.
४) संस्थापक अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना
सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचा सुवर्ण मोहोत्सव १९९७ ला होणार होता. त्यापूर्वी माजी विद्यार्थ्यांची सक्रीय संघटना स्थापन होणे आवश्यक होते. १९९५ साली प्राचार्यांनी बोलावलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सभेत सर्व ३०० विद्यार्थ्यांनी एकमताने अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. ही जबाबदारी सांभाळून संघटनेचा भक्कम पाया घातला.
५) मोटारकार चालवण्याचे शिक्षण
वयाच्या ६४ व्या वर्षी मोटारकार चालवण्याचे शिक्षण घेतले, व आत्मविश्वासाने कार चालवू लागलो.
६) संगणक शिक्षण
नव्या पिढीच्या मागे राहायचे नसेल तर संगणक शिक्षण आवश्यक होते.संगणक विकत घेतला, शिक्षण घेतले व आज संगणक वापरून आवश्यक ती माहिती मिळवत आहे.
७) वाचकांचा पत्रव्यवहार यात ५०० पेक्षा जास्त पत्रे प्रसिद्ध झाली.
८) कथा व कविता लेखन
१९८८ साली कथा लिहायला सुरवात केली. आज अखेर ४० कथा, ३५ कविता निरनिराळ्या वर्तमानपत्रात, मासिकात व साप्ताहिकात प्रकाशित झाल्या.
९) पुस्तक प्रकाशन - चार पुस्तके प्रकाशीत झाली
अ ) “नंदादीप” हे माझे आत्मचरित्रपर पुस्तक २००९ साली
ब ) “मर्मबंधातील ठेव” कथा, कविता व पोवाडे(स्वलिखित) संग्रह, २००९ साली
क ) “सुकन्या “ कथासंग्रह, २०१९ साली
ड ) “ अविस्मरणीय खजिना” माझे निवडक लेख, पत्रे व कथा यांचा संग्रह, जानेवारी २०२० साली
१०) पोवाडे लेखन व सादरीकरण
क्रांतीसिंह जेष्ठ नागरिक मंडळ, पेन्शनर्स असोसिएशन, इंजिनीअर्स अँड आर्किटेक्टस असोसिएशन,या संस्थांवर पोवाडे रचून, शाहिरी वेश परिधान करून, डफ, झाँज, तबला, पेटी या वाद्यांसह सह साथीदार तयार करून, सादर केले.त्याचे रेकॉर्डिंग करून व्ही सी डी तयार केल्या. त्या त्या संस्थांच्या कार्यक्रमात त्या दाखवल्या .
११) राष्ट्रभक्तीवर गीते - रचना व सादरीकरण
प्रत्येक १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी रोटरी क्लब व जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त झेंडावंदन कार्यक्रमात २०१३ पासून राष्ट्रभक्तीवर गीत स्वतः रचून सादर करीत आहे.
१२) संपूर्ण वंदेमातरम्
स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे संपूर्ण वंदेमातरम् हे गीत आज म्हटले जात नाही. ते गीत पाठ करून काही कार्यक्रमात शेवटी सादर केले.
१३) आकाशवाणीवर कथा सादरीकरण
सांगली आकाशवाणी केंद्रावर माझ्या काही कथा सादर करण्याची संधी मिळाली, काही कथा कलाकारांनी सादर केल्या.
१४) खेळाच्या माध्यमातून गणिताचा अभ्यास
बेरीज,वजाबाकी गुणाकार व भागाकार यावरील गणिते सोडवण्यासाठी शैक्षणिक साधन व गणिताचा खेळ तयार केला .
आपण खेळ खेळतो आहोत असे मुलांना वाटते पण गणितेच तोंडी सोडवली जातात. अशा प्रकारचा खेळ ”सुवर्णपदक जिंका” या नावाने तयार केला व त्याची प्रात्यक्षिके २५ ते ३० शाळेमध्ये केली.
१५) सामाजिक व सत्कार
अ ) विश्रामबाग रेल्वे गेटवर उड्डाणपूल व्हावा म्हणून प्रयत्न केले. उड्डाणपूल झाला, जेष्ठनागरिक मंडळातर्फे सत्कार.
ब ) कोणतीही फी घेता ४ थी च्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेऊन १०० पेक्षा जास्त विद्द्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून दिली, अश्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचेकडून देणग्या गोळा करून तीन खोल्यांचा बंगला बांधून दिला, म्हणून विसावा मंडळाच्या शिवोत्सवात सत्कार.
१६) बासरी वादन
७५ वर्षानंतर बासरीवर गीते वाजवणेस शिकलो व निरनिराळ्या संस्थांत विविध गुणदर्शन कार्यक्रमात बासरीवर गीते सदर करून आनंद घेतला.
१७) परदेश प्रवास
अ) अमेरिका -- २००० साली सहा महिने.
ब) अमेरिका -- २००३ साली ४ महिने.
क ) युरोप -- २००७ साली १५ दिवस.
ड ) थायलंड, मलेशिया, सिंगापूर -- २००० साली १२ दिवस.
१८) गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना मातोश्रींचे स्मरणार्थ बक्षिसे
२००८ साली ७५ वर्षे पुरी झाल्यानंतर कोणताही समारंभ न करता ७५००० रु.ची ठेव बँकेत ठेवली व २००९ पासून त्याच्या व्याजातून वालचंद महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जात आहेत.
१९) सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देणग्या
अ ) वनवासी कल्याणआश्रम ब) अपंग सेवा केंद्र
क ) जनकल्याण समिती ड) ओजस प्रतिष्ठान
इ ) जीवन संवर्धन संस्था फ) वृद्धाश्रम
अशा संस्थांना प्रतिवर्षी ५०,००० रु. या प्रमाणे गेली १० वर्षे देणगी देत आहे.
२०) “नंदादीप” हे पुस्तक उल्लेखनीय साहित्य
माझ्या “ नंदादीप” या पुस्तकाला संगमनेरच्या इतिहास संशोधन मंडळाने, अनंतफंदी साहित्य पुरस्कार समितीच्या वतीने ‘उल्लेखनीय साहित्य’ म्हणून २००९ मध्ये सन्मानपत्र प्रदान केले.
२१) कथास्पर्धा -- प्रथम क्रमांक
जायंट्स ग्रुप ऑफ सहेली , सांगली -- २०११
२२) कविता स्पर्धा -- प्रथम क्रमांक
“साद प्रतिसाद” यड्राव या संस्थेच्या कविता, स्पर्धेत प्रथम क्रमांक.
२३) निबंध स्पर्धा -- प्रथम क्रमांक
डॉ .एम .के.पाटील, जेष्ठ नागरिक संघ , जयसिंगपूर -- २०१३
२४) उत्कृष्ठ पत्रलेखन
इचलकरंजीच्या वृत्तपत्र लेखक संघटनेने “ उत्कुष्ट पत्रलेखक “ म्हणून २००९ साली सत्कार
२५) वृद्धांच्या चालण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक
सांगली जिल्हा पोलीस विभागातर्फे ७५ वर्षावरील वृद्धांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक.
२६) जीवन गौरव पुरस्कार
अ ) रोटरी क्लब ऑफ कृष्णाव्हॅली -- टी .के.पाटील यांचे नावे जीवन गौरव पुरस्कार -- २००८
ब ) साई प्रकाशन संस्था, मिरज, या संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार -- २०१३
निवृत्तीनंतर अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत, त्यापैकी मी किती क्षेत्रात प्रवेश करून आनंद घेतला,हे या लेखावरून आपल्याला समजले असेल.मला जमेल की नाही हा विचार सोडून द्यावा व जिद्दीने प्रयत्न करीत गेल्यास यश मिळेल आणि आनंदही मिळेल. निरनिराळ्या क्षेत्रात गुंतून राहिल्यास वेळ आनंदात जाईल व प्रकृतीच्या बारीक सारीक तक्रारी जाणवणार नाहीत.
प्रा.एच.यू .कुलकर्णी