प्रा. अशोक अनंत खांडेकर याना श्रद्धांजली -डाॅ. सतीश मा. कुलकर्णी
कै. प्रा.अशोक अ. खांडेकर यांचा १५वा स्मृतिदिन १६ जानेवारी २०१९ रोजीचा. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करणारा लेख -
डाॅ. सतीश मा. कुलकर्णी
कार्यमग्नता झाले जीवन, मृत्यू ही विश्रांती
( प्रा. अशोक अनंत खांडेकर याना श्रद्धांजली)
- प्रा. डॉ. सतीश मा. कुलकर्णी
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपयोजित यंत्रशास्त्र विभागातील निवृत्त प्रा. अशोक अनंत खांडेकर यांचे १६ जानेवारी २००४ रोजी ठाणे येथे आकस्मिक देहावसान झाले. त्यांच्या नुसत्या आठवणीनेही मन गलबलून जाते. एक हुशार माणूस म्हणून मोठ्या उंचीवर असलेली आणि आपल्या आसपास जीवन व्यतीत केलेली व्यक्ती कार्यमंचावरून अचानक उचलली जावी यापरती धक्का देणारी गोष्ट नाही.
महाविद्यालयात मी आणि प्रा. खांडेकर जरी एकाच विभागात काम करीत असलो तरी त्यांचा व माझा परिचय हा सांगलीच्या कृष्णाकाठच्या बलभीम व्यायामशाळेतील. सर तेंव्हा तेथे व्यायामासाठी यायचे. त्यावेळी ते पदविका अभ्यासक्रम शिकत होते आणि मी सांगली हायस्कूलमध्ये शिकत होतो. एक हुशार विद्यार्थी म्हणून ते सुपरिचित होते. करैला फिरविणा-या खांडेकरांचे बलदंड शरीर आजही नजरेपुढून हलत नाही. पुढे याच बलवान शरिरामुळे आणि दुर्दम्य आशावादामुळे भविष्यातील वाटचालीविषयी त्यांच्या मनामध्ये एकप्रकारचा विलक्षण आत्मविश्वास निर्माण झाला होता. सरांचा सगळा प्रवास विचारांशी कठोरपणे प्रामाणिक राहण्याचा असला तरी दुस-याबरोबरच्या व्यवहाराच्या बाबतीत ते कमालीचे लवचिक असत. मतभेद स्वीकारून मनभेदाचा यत्किंचितही स्पर्श न झालेल्या अशा नितळ मनाचा हा कार्यकर्ता होता. ‘ न तुटे वाद, संवाद तो हीतकारी ‘ अशी वृत्ती मन:पूत जोपासणारा हा माणूस वेडा माणूस होता.
महाविद्यालयातील आपले नेमलेले कार्य, शैक्षणिक आणि अनुषंगिक कर्तव्ये, ते कटाक्षाने पार पाडीत. याशिवाय त्यांच्या ‘माणूस’ या नात्याने, अनेक विद्यार्थ्यांना विविध प्रसंगी मार्गदर्शन मार्गदर्शन करीत, प्रसंगी मदतीचा हात पुढे करीत. हे झाले लौकीक अंग. पण विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची नागरिक म्हणून होणा-या जडणघडणीची अंशत: जबाबदारी आपली आहे असे मानणारा देशभक्त. आपल्या अशा अंगीकृत कार्यावर अविचल निष्ठा असणारा समाजकारणी होता.
जे दुस-यासी सांगावे | ते तुवा स्वयेचि करावे ||
ऐसे केलिया स्वभावे | समाधान सकलिका ||
या न्यायाने जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद त्यानी घेतला आणि इतरांनीही तसे करावे असे वाटायला लागण्याइतका कृतीचा आदर्श खुलेपणाने पुढे ठेवला. पूर्वायुष्यामध्ये वेद-उपनिषदांचे परिशीलन राहून गेले होते. आता निवृत्तीनंतरही जनकल्याण समितीशी निगडित वंचितांसाठी शिक्षण या उपक्रमात काम करीत असतानाही आपल्या या वेद-उपनिषदांत लपलेले प्रचंड ज्ञान मधुमाशीप्रमाणे टिपण्याची त्यांची कल्पना होती.तथापि नियतीला हे आवश्यक वाटले नाही. ज्यांचे जीवन म्हणजेच एक कृतीशील निरामय जीवनाचा आरसा होता अशा व्यक्तीला वेद-उपनिषदांच्या परिशीलनात फारतर आपल्या उभ्या आयुष्याचेच प्रतिबिंब दिसले असते. अणि कृतज्ञता वाटली असती एवढेच.
कै. अशोकरावांच्या व्यक्तिमत्वाचा शोध धेत असता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे त्यांचे नजरेत भरणारे साधेपण. अभियांत्रिकीची पदवीप्राप्त , एक वर स्वत:च्या लग्नात सुद्धा विजार आणि सदरा घालतो. या साधेपणाला काय म्हणावे ?
सर दयेचा सागर होते, करुणेचे कोठार होते, घरीसुद्धा एखाद्या स्वयंसेवकाप्रमाणे कामे करीत. कुटुंबाकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता समाजकल्याणासाठी त्यांनी आपले जीवन झोकून दिले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम असो, जनकल्याण समितीचे कार्य असो, विवेकानंद शीला स्मारक समितीचे काम असो, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात देण्याचे, धीर देण्याचे काम असो खांडेकर सर कुठेही कमी पडले नाहीत. संपर्कात येणा-या प्रत्येकात असलेल्या सुप्त गुणांची जोपासना करणारे, त्याला खतपाणी घालणारे आणि नवीन गुणांची बीजे रुजविणारे असे ते स्नेहमूर्ती होते, जागते कार्यकर्ते होते.
कै. खांडेकरांच्या अजून एका पैलूचा उल्लेख करून ह्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा धावता आढावा मी आटोपता घेणार आहे. प्रा. खांडेकरांच्या कृती आणि उक्तीवरून ते कवि मनाचे असतील अशी शंका येत असे, पण ते स्वत: कवि असतील याची कधी माहिती नव्हती. ती माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून समजली. काही कविता / रचना पाहिल्यावर खात्री झाली. प्रसंगोपात त्यांनी खूप रचना केलेल्या आहेत. कवितांच्या या माध्यमातून त्यांनी वेचक वेधक असे मार्गदर्शन आपल्या मुलांना केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने कन्या ‘संपदा’ साठी ते लिहितात.
ज्ञान ठेवा, जे मिळे |
प्रयत्नाने साध्य सारे |
गुणी हो शीलवान हो |
आशिर्वचाहून आज मी |
काय तुजला द्यायचे?
चि. वैभव ( शैलेंद्र ) याच्यासाठी ते लिहितात.
वैर कोणाशी नको | तरी शक्ती अंगी ती हवी |
दुर्जनांना भीति दावित | दुर्बला पाठी उभी ||
भरत भूवर थोर आई |श्रेष्ठ गुरू माता पिता |
दैवते ही पूज्य सारी | नित्य तुम्ही सेवीत जा ||
वर्ष शत आयु मिळो | सुदृढ सुयशी चांगले |
दुरित इडा -पीडा टळो | हेच प्रभुसी मागणे ||
ही अपेक्षा, ही इच्छा, हे मार्गदर्शन केवळ त्यांच्या मुलांपुरते मर्यादित नव्हते तर असे पसायदान त्यांनी प्रत्येकासाठीच मागितले आहे. खांडेकर सरांनी आपले जीवन वरील रचनेप्रमाणे कारणी लावले. आपल्या चरित्र आणि चारित्र्यातून आणि ज्या संघटनेसाठी त्यांनी आपले जीवन वेचले, तिच्या माध्यमातून दुर्बलांसाठी अनेकविध कार्ये करीत करीत परमप्रिय मातृभूमीसाठी
महामंगले पूण्य भूमे त्वदर्थे |
पतत्वेषु कार्यो नमस्ते नमस्ते ||
ही प्रार्थना कै. अशोक खांडेकर यांनी सार्थ केली.
अशा अनुशासनशील कविला काव्यातून भावांजली अर्पण करू या.
||भावांजली||
आम्ही नाही पाहिला, आम्ही नाही देखिला |
अशोकरावांच्या सारिखा, कार्यकर्ता न पाहिला || ध्रु. ||
उच्चविद्याविभूषित थोर, भगवत् गीतेचा अनुचर |
सर्व सामान्या आधार, ऐसा नाही पाहिला ||१||
राजकिय, सामाजिक जाणीव अल्पांशानेही न हो क्षीण |
आणीबाणीस हो सादर, ऐसा नाही पाहिला || २ ||
शिक्षण मूल्यांचे दिधले, मूल्याधिष्ठित काम केले |
संघटनेचा जीव की प्राण, ऐसा नाही पाहिला || ३ ||
—- प्रा. डॉ. सतीश मा. कुलकर्णी