Walchand Alumni Meet 2019
सकाळ वृत्तसेवा रविवार, 13 जानेवारी 2019
Walchand College Alumni Meet - 12 Jan. 2019
सांगली- तुम्ही मिळविलेले उच्च ज्ञान आणि त्यातून आलेली पात्रता याचा उपयोग व्यक्ती आणि समाजात बदल घडविण्यासाठी कसा होतो, हेच महत्त्वाचे आहे आणि तेच तुमच्या आयुष्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे मत "सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बेहरे-राठी ग्रुपचे अध्यक्ष राम राठी, महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. पारीषवाड, मेळाव्याचे मुख्य संयोजक संजय धायगुडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या वालचंदच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या शनिवारी होत असतो. या मेळाव्यात "सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने महाविद्यालयास दिलेल्या एक कोटींच्या निधीच्या विनियोगाबाबत झालेल्या सामंजस्य करारावर उभय बाजूने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या वेळी पवार म्हणाले, ""तुम्ही कोण आहात, तुमची स्वतःची ओळख, इतरांना तुम्ही सांगू शकाल असे तुम्ही प्राप्त केलली अत्युच्च पात्रता, ती ज्यांच्यासाठी वापरणार आहात तो टार्गेट ऑडियन्स, त्यांनी तुमच्याकडून ते का घ्यावे आणि त्यामुळे जीवनात कोणता बदल होणार आहे अशा पाच प्रश्नांची उत्तरे तुम्ही आयुष्यात शोधली पाहिजेत. आजचे आपले एकत्र येणेही समाजाच्या बदलासाठी आपण काय योगदान देऊ शकतो हे अधिक महत्त्वाचे. इतरांच्या जीवनात काही चांगला बदल व्हावा. तेच तुमच्या आयुष्याचे उद्दिष्ट असायला हवे.''
ते म्हणाले, ""युरोपमधील सर्व्हे सांगतात की जर्मनी, इंग्लंडमधील सध्याचे 70 टक्के रोजगार कालबाह्य होतील. नव्याने संधी निर्माण होतील. त्या कोणत्या असतील याचा वेध शिक्षणक्षेत्राने घेतला पाहिजे. मी इस्राईलमधील एका विद्यापीठात गेलो असता. तिथल्या जर्नालिझम डिपार्टमेंटला भेट दिली. तिथे विद्यार्थी मायक्रोस्कोपखाली पेशींचा अभ्यास करीत होते. दोन पेशींमधील परस्पर संवाद आणि जर्नालिझमचा काय संबंध, असा प्रश्न मी विचारला. तेव्हा संज्ञापनाचे कार्य किती सूक्ष्म पातळीवर अभ्यासले जाऊ शकते हे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी आंतरविद्याशाखांवर आधारित अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य असेल. एखाद्या विद्याशाखेच्या अभ्यासाची व्याप्ती किती वाढू शकते हेही दिसू शकते, हे यातून दिसून येते. याचा भविष्यातील नव्या रोजगारांच्या संधींशी संबंध आहे.''
"सकाळ'सोबत या !
पवार म्हणाले, ""आम्ही माध्यम क्षेत्राशिवायही कौशल्य विकास, उद्यमशीलता विकास, ग्रामीण-शेती विकास, उद्योग क्षेत्रासाठी कन्सलटन्सी, स्मार्ट सिटी, कम्युनिटी डेव्हलपमेंट अशा विविधांगी क्षेत्रात देश-परदेशांत काम करीत आहोत. तुम्हीही या कामात सोबत याल तर तुमचे स्वागतच असेल.''
"वालचंद'चे धडे
प्रमुख पाहुणे राम राठी यांनी "वालचंद'मध्ये कोणते धडे घेतले याचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, ""इथे मी भोजन विभागाचा सचिव होतो. 1962 च्या चीन युद्ध काळात आम्ही शहरात फिरून मोठा सैनिक कल्याण निधी गोळा केला. तेव्हाचे जिल्हाधिकारी शिंदे यांच्याशी माझी चांगली ओळख झाली. त्यातूनच मेसच्या वार्षिक फिस्टला मी त्यांना निमंत्रण दिले. त्या वेळी स्वतःच्या पाहुण्यांचे मेसकडे वेगळे पैसे भरावे लागायचे. मी मात्र परस्पर बोलवले. अधीक्षक बर्वे सरांनी याबद्दल मला जाब विचारला आणि सचिव पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले. खूप वाईट वाटले. पण त्यातून एक धडा घेतला. आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्या समूह अथवा संस्थेतील सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा. आमच्या ग्रुपच्या भागीदारीला 44 वर्षे पूर्ण झाली. त्याचे श्रेय इथल्या "अशा' अनेक धड्यांनाच द्यावे लागेल.'