प्रा.(डॉ.) हेमंत अभ्यंकर, इलेक्ट्रिकल-१९७१. यांचा लेख ...
मित्रहो,
(मे २०२०साली संपर्क सुरु झाले आणि १९७१ साली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथुन पदवीधर झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संमेलन भरवायचे ठरले.या युगात संपर्क सोपा झाल्याने झपाट्यात साठ-सत्तर लोकांचा संपर्क झाला.१८९ विद्यार्थी पास झाले असावेत, असा अनुमान तेंव्हा काढलेल्या फोटोमधील नवे वाचुन बांधण्यात आले. आयुष्यमान वाढल्याने सगळेच हयात असावेत व जगाच्या पाठीवर कुठेतरी स्थायिक झाले असावेत, म्हणुन संपर्काची सर्व साधने वापरायचे ठरले आहे. सालाबादप्रमाणे महाविद्यालयात होणाऱ्या माजी विद्यार्थी संमेलनास हजर राहावे काय?आपला काय कार्यक्रम असावा, इत्यादि प्रश्णांना उत्तर/चालना देण्यासाठी हा लेख. पण सर्वच माजीविद्यार्थी संमेलनांना उपयोगी पडेल असे वाटुन ब्लॉगवर टाकत आहे.)
१९७१मध्ये आपण सर्व जण पदवीधर झालो आणि विविध क्षेत्रात काम करू लागलो.अनेकांना पडेल ते काम करण्याची वेळ आली.उद्योग-व्यवसायांची परिस्थिती चांगली नव्हती, शिवाजी विद्यापीठ नुकतेच स्थापन झाल्याने आपण त्या विद्यापीठाचे पदवीधर झालो आणि दुर्दैवाने त्या विद्यापीठाच्या पदवीधरांनी नौकरीसाठी अर्ज करू नयेत, असा ठेका उद्योजकांनी त्याकाळी लावला होता. हे सांगण्याचे कारण इतकेच कि पदवी मिळाली तरी सर्व काही आलबेल झाले असे नव्हते. मला वर्गातला गिल्बर्ट तेंव्हा भेटला होता.त्याला त्याच्या वडिलांच्या कंपनीतच, तात्पुरती का होईना, नौकरी मिळाली होती. “अरे वा छान झाले” असे मी त्याला म्हटले तर तो म्हणाला, “हेम्या, माझे पद अभियंत्याचे असले तरी काम मजुरांच्या देखरेखीचे आहे रे!”
पण हा धकाधकीचा काळ प्रत्येक पदाविधाराच्या आयुष्यात येतो आणि अनेक वर्षे चालतो.आपापल्या महाविद्यालयात आणि तिथल्या वसतिगृहात केलेली धमाल आठवायलाही वेळ मिळत नाही.मनातल्या गोष्टी शेअर करायला माणसं,जागा आणि वेळ सगळंच योग्य असावं लागतं. हवे ते दोन मित्र एकत्र येणच कठीण होतं तर या मनातल्या गोष्टी मनातच राहुन जातात.
मी आणि एस.ई.ला माझ्या तुकडीत असलेला ठाकुरदेसाई दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळात जेवतांना अचानक १९७५मध्ये भेटलो होतो, म्हणजे पदवी घेतल्यावर चार वर्षांनी.कसा आहे,काय करतो ई. झाले कि कामासाठी लगेच पांगलो.त्याला आज पंचेचाळीस वर्षे झाली. आता तोही पुण्यात असावा, पण साधा संपर्कही झालेला नाही.
वर्ष-सहा महिन्यांपुर्वी हि संमेलन भरवण्याची कल्पना मी दोघा तिघांशी बोललो, ‘किमया’ हॉटेलमध्ये मिनी-मिटींग्ज झाल्या व अन्यत्र पार्ट्याही झोडल्या. पण कांही जणांचा प्रश्न एकच, “हेम्या,संमेलनात ‘हेच’ करायचं असेल तर आपण पुण्यातच, वरचेवर करत राहू की.सगळ्यांनी उठुन सांगलीत कस जाणार,आणि इतकी जास्त तकतक कशाला करायची?”
पदवी प्राप्त होऊन दहा वर्षे झाली कि बऱ्याच विद्यार्थ्यांना इसळा येतो. “चला कॉलेजात चक्कर मारू या” असे वाटू लागते. आपली नोकरी, आपली बायको, आपले घर सगळे जुन्या मित्रांसमोर मिरवावेसे वाटते. त्यांचा मित्रांना हकारा चालू होतो. कोण कोण येणार याची तपासणी होते. चार लोक जमले कि केंव्हा जायचे, कॉलेजमध्ये जाऊन काय करायचे त्याचा विचार होतो.तिथे ओळखीचे कोणी आहे का इत्यादी चौकशी होते,कार्यक्रम ठरतो, होतो किंवा फिस्कटतो. अशा वेळी माजी विद्यार्थ्यांची संगठना कामी येते. त्यांनीच वार्षिक कार्यक्रम ठरवला तर जाणे सोयीचे होते. जास्त लोक भेटतात. आपला व्यवसाय वाढीस लावणे या भेटीगाठींनी शक्य होते.
ज्येष्ठ विद्यार्थी आपल्या पदवी ग्रहणाचा रौप्यमहोत्सव साजरी करू लागली आहेत.त्यांचे समोर महाविद्यालयाची प्रगती मांडण्याची प्रथा सुरु झाली आहे. हे सगळेच अभियंते ज्येष्ठ पदांवर कार्यरत असल्याने नूतन पदवीधरांना चांगल्या नौकऱ्या ते देऊ लागले आहेत. भरगोस आर्थिक मदतही त्यांनी दिली आहे.
मग पदवी प्राप्तीला पन्नास वर्षे झाली म्हणुन,या निमित्त्याने, आपण जे संमेलन करणार/ एकत्र जमणार त्याचा उद्देश्य मनात स्पष्ट असेल तरच हे संमेलन कुठे व्हावे,केंव्हा व्हावे,किती दिवस असावे आणि त्या काळात आपला कार्यक्रम काय असावा हे ठरवणे सोपे जाईल.वीरकुमार एखादी कार्यक्रम पत्रिका सुचवा म्हणुन दोन दिवसापासुन मागे लागलाय. मग म्हटलं आपले विचार लिखित स्वरुपात मांडावेत म्हणजे विचारांचा गोंधळ नको.सांगलीच्या भाषेत ‘घोळ’ नको. म्हणुन हे लेखन.
आपल्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना अनेक वर्षे कार्यरत आहे. प्रा.पी.ए.के.(पाक), मालू, विजय दिवाण, रिसबुड अशा लोकांनी सुरुवातीला काम केल्यावर व पुढेरौप्यमहोत्सव साजरा केल्यानंतरअनेक वर्षांनी प्रा. हरिभाऊ( HUK) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्त्यांनी या संघटनेचे रुपांतर एका TRUST मध्ये केले. मी अनेक वर्षे यात कार्यरत असुन पुण्यात अनेक वर्षे आम्ही वार्षिक स्नेह-संमेलने भरवली. खूप चांगले आणि मोठे उपक्रमही राबवले. माझ्या अध्यक्षतेखाली, सन २०१०-११ मध्ये आपल्या संघटनेने असे ठरवले कि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, दर वर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी, महाविद्यालयाचे आवारात व्हावे आणि त्यानुसार महाविद्यालयाचा गेली दहा वर्षे असा मेळावा त्याच दिवशी होत आहे, आणि म्हणुन आपल्या संमेलनाची तारीख शनिवार दि.९ जानेवारी २०२१.
संमेलनाचे पहिले कारण असते कि पुर्वीचे दिवस आठवुन ‘To Relive’. Nostalgia . त्यासाठी माजी विद्यार्थ्यांना आपल्या जुन्या खोल्यांमध्ये रहायची इच्छा होते. त्याला महाविद्यालय परवानगी देते. वसतीगृहातली मुले सर्वतोपरी सहाय्य करतात. आपल्या मेस मध्ये जेवायचे आकर्षण असते ते शक्य होते.
सकाळी नाव नोंदणी झाली कि नाश्ता करून उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला जातो.विशेष कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. जुना काळ आठवला जातो. “सोडा-लेमन, सोडा-लेमन, जिंजर आलेपाक; वालचंद कॉलेज, वालचंद कॉलेज, ऑलवेज ऑन द टॉप” हि घोषणाबाजी होते. नंतर बॅचवाइज विद्यार्थी एकत्र येऊन ओळख/माहिती देवाण-घेवाण होते.
जेवणानंतर प्रत्येक विभागामध्ये आपापले विद्यार्थी जमतात,त्यांना विभागातील नविन वैशिठ्ये,प्रगती ई.ची माहिती दिली जाते.सर्व शिक्षक व सध्याचे विद्यार्थी यात सहभागी होतात. हजर माजी विद्यार्थ्यांच्याशी सल्ला मसलत केली जाते. आजी विद्यार्थ्यांनी केलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले जातात.आता सर्वच विभागात पदाव्य्तुतर शिक्षण दिले जाते त्यामुळे संशोधन प्रकल्पही बरेच केले जातात.
सायंकाळी करमणुकीचा कार्यक्रम होऊन दिवस संपतो.या कार्यक्रमात अनेक आजी-माजी कलाकारही आपली कला सादर करतात.
यात होणाऱ्या भेटीगाठींचा आपापल्या व्यवसायात फायदा होतो, त्यामुळे लोक हिरीहिरीने सहभागी होतात.
बरेच माजी विद्यार्थी गटा=गटाने भटकंती करतात.गणपती मंदिर, नदीचा घाट,हरिपूर ई.ठिकाणी जातात.
कांही गट नरसोबाची वाडी ई. फिरून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जातात.मटन ओरपून मुक्कामाला पन्हाळा येथे जातात.तिथे एक दिवस गप्पा-टप्पा मारून पुन्हा भेटीची आश्वासने देऊन आपापले घरी परतात.
आपला कार्यक्रम आपण ठरवू तसा.
गतवर्षी हा सर्व भाग पुराच्या हाहाकारात सापडला, तर यंदा कोविड्ची महामारी! लॉकडाउन केंव्हा उठेल माहित नाही. परिस्थिती केंव्हा स्थिरस्थावर होईल माहित नाही. आपण योजना करून वाट पाहणे एवढेच आपल्या हातात आहे.
मला वाटते आपण सर्वांनी एक दिवस आधी जमावे. नजिकच्या चांगल्या हॉटेलमध्ये एकत्र राहावे.आपल्या भेटी साजऱ्या करून दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाचा सर्व कार्यक्रम एकत्रित पणे उपभोगावा आणि सांगता करावी.पुढे गटा-गटांनी अहलीवर जाणे शक्य आहे.
धन्यवाद!
प्रा.(डॉ.) हेमंत अभ्यंकर, इलेक्ट्रिकल-१९७१.